गुरुग्राम : वृत्तसंस्था – विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारचालकाला आडवणे एका पोलीस हवालदाराला चांगलेच महागात पडले आहे. पोलीस हवालदाराने कार आडवल्यानंतर कार चालकाने गाडी थेट हवालदाराच्या अंगावर घातली. त्यामुळे पोलीस हवालदार कारच्या बोनेटव पडले. एवढे होऊन देखील कार चालकाने कार न थांबवता १०० मीटर गाडी चालवली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गुरुग्राम येथे घडली.
दिल्ली येथील द्वरका येथे राहणाऱ्या करण या युवकावर सेक्टर २९ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
गुरुग्राम येथील अतुल कटारिया चौकातून हुडा सिटी सेंटर कडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरु आहे. त्यामुळे सेक्टर २९ मधील काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे किंगडम ऑफ ड्रीम, महामार्ग आणि जुन्या गुरुग्रामकडे जाणारे वाहन चालक उलट्या साईडने येतात. बुधवारी सायंकाळी ईको स्पोर्टस कार विरुद्ध दिशेने येत होती. त्यावेळी कर्तव्य बजावत असणारे पोलीस हवालदार परमिंदर यांनी कार चालकाला थांबवले.
पोलीस हवालदार परमिंदर यांनी कार चालकाकडे वाहन परवाना मागितला. कार चालकाने वाहन परवाना नसल्याने सांगून तो आपल्या पोलीस असेलेल्या नातेवाईकाशी बोलणे करुन देऊ लागला. मात्र, पोलीस हवालदार परमिंदर यांनी त्याचे काही न ऐकल्याने आरोपी कारमध्ये बसून पळून जाऊ लागला. त्यावेळी या दुसरा पोलीस कर्मचारी कपिल याने त्याचा पाठलाग करुन ताब्यात घेतले. रात्री उशीरा आरोपीवर हत्येचा प्रयत्न आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.