एकीकडे ‘कोरोना’ तर दुसरीकडे महाराष्ट्रावर येणार ‘आस्मानी’ संकट, हवामान खात्याचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतात कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातही इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून वारंवार घरातून बाहेर न पाडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोरोना सारख्या घातक विषाणूला रोखण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात १४४ लागू करण्यात आला आहे. पण आता कोरोनासोबतच महाराष्ट्राला अस्मानी संकटाला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे, कारण येत्या २४ आणि २५ मार्चला महाराष्ट्रात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केला आहे. मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेतीचं पुन्हा नुकसान होण्याची शक्यता आहे.

पुढील ४८ तासांत गडगडाटासह पावसाचा अंदाज

देशासह राज्यात कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढत असतानाच राज्याच्या काही भागांवर पुढील 48 तासांत ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज स्कायमेटकडूनही वर्तवण्यात आला आहे. औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यातील जिल्हे, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर, महाबळेश्वर, खान्देशमधील जळगाव जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

महाराष्ट्राशिवाय इतर राज्यातही पावसाचा इशारा

राजस्थानमध्ये 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे, 26 मार्च इंदूर, उज्जैन, रतलाम, देवास, कोटा, सवाई माधोपूर, जोधपूर, उदयपूर, अहमदाबाद, बडोदा, गांधीनगर आणि नाशिक अशा अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 27 मार्चपासून दक्षिण राजस्थान आणि गुजरातमध्ये पाऊस कमी होईल, परंतु मध्य प्रदेशात भोपाळसह अनेक शहरांमध्ये पाऊस सुरूच राहील असा स्कायमेटनं अंदाज वर्तवला आहे. मार्च महिन्यातील होणाऱ्या या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

शेतकरी चिंतेत

गेल्या वर्षी महाराष्ट्रात झालेल्या महापुराच्या स्थितीमधून शेतकरी कसाबसा सावरून आता यावर्षी पिके घेत आहे. काही दिवसांपूर्वी देखील महाराष्ट्रातील काही भागात गारपीट झाली होती त्यामुळे द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान झाले होते. याशिवाय रब्बी हंगामातील गहू , हरभरा या पिकांना देखील पावसामुळे मोठे नुकसान पोहचते. आता पुन्हा एकदा ऐण काढणीला पीक आले असताना पुन्हा पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.