Alert ! हिवाळ्यामध्ये सोसावी लागेल ‘डबल महामारी’, तयार राहण्याचा शास्त्रज्ञांनी दिला इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसची प्रकरणे सतत वाढत आहेत, अगदी न्यूझीलंडसारख्या देशांमध्ये तो परतत आहे. अशा परिस्थितीत वैज्ञानिकांनी येत्या हिवाळ्यात ‘दुप्पट महामारी’ सारख्या परिस्थितीचा इशारा दिला आहे. सार्वजनिक आरोग्य तज्ञांच्या म्हणण्यानुसार, हिवाळा वाईट बातमी घेऊन येत आहे आणि कोविड-१९ सह हंगामी फ्लूचा कहर येईल. शास्त्रज्ञ या परिस्थितीला ‘ट्वीनडेमिक’ म्हणत आहेत.

एका वृत्तसंस्थेनुसार, हिवाळ्यात हंगामी फ्लू हा एक सामान्य रोग आहे, परंतु बहुतेक रुग्णालये या आजाराच्या रुग्णांनी भरलेली असतात. मात्र हे वर्ष वेगळे आहे आणि सर्व रुग्णालये आधीपासूनच कोविड-१९ रूग्णांनी भरलेली आहेत. अशा परिस्थितीत हंगामी फ्लूच्या रूग्णांवर उपचार कोठे होतील? दुसरा प्रश्न असा आहे की, कोविड-१९ आणि हंगामी फ्लूची सुरुवातीची लक्षणे देखील एकसारखी आहेत, अशा परिस्थितीत रुग्णालयांमध्ये गर्दी वाढेल आणि संभ्रमही निर्माण होईल. हंगामी फ्लू टाळण्यासाठी लोकांना ‘फ्लू शॉट्’ दिले जायचे, जे यावर्षी शक्य नाही. यामुळे रुग्णांची संख्या वेगाने वाढेल. तज्ञांच्या मते फ्लूची लक्षणे देखील- ताप, डोकेदुखी, कफ, घसा दुखणे, शारीरिक वेदना ही आहेत. एकीकडे हे कोविड-१९ सारखेच दिसते, तसेच कोरोना संक्रमणाचा धोका अधिक वाढवतो. फ्लू होण्याची शक्यता असलेल्या व्यक्तीसाठी कोरोना संसर्ग आणखी घातक सिद्ध होऊ शकतो.

शास्त्रज्ञांची चिंता वाढली
जगभरातील शास्त्रज्ञ या ‘ट्वीनडेमिक’बाबत फारच चिंतित आहेत आणि ‘फ्लू शॉट’ वर खूप जोर देत आहेत. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) चे संचालक रॉबर्ट रेडफिल्ड म्हणाले की, आम्ही मोठ्या कंपन्यांना फ्लू शॉट्स देण्यासाठी मोहीम राबवायला सांगत आहोत. किमान त्यांच्या कर्मचार्‍यांना ती उपलब्ध करुन द्या. सीडीसी दरवर्षी रूग्णालयात ५ लाख डोस देते, पण यावर्षी भीतीमुळे ९.३ मिलियन फ्लू शॉट्स देण्याचा आदेश आहे. अमेरिकन कोरोना तज्ञ डॉक्टर अँथनी फौची यांनीही लोकांना फ्लूचे शॉट घेण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, याद्वारे तुम्ही एकाच वेळी दोन श्वसन रोगांपैकी कोणत्याही एकाच्या धोक्यातून मुक्त व्हाल.

अगदी ब्रिटनमध्येही परिस्थिती लक्षात घेता पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी फ्लू शॉटची मोहीम सुरू केली आहे. त्यांनी फ्लूच्या लसीला विरोध करणाऱ्या लोकांना वेडे म्हटले आणि म्हणाले की, महामारीविरूद्ध लढा सुरू राहू शकणारा हा एकमेव मार्ग आहे. ऑस्ट्रेलियाने एप्रिल महिन्यातच देशातील बर्‍याच भागात अशी ‘फ्लू शॉट’ मोहीम सुरू केली होती. अमेरिकेत नर्सरी शाळेतच मुलांसाठी लसीची व्यवस्था असते, पण यावेळी शाळा बंद असल्यामुळे लसीकरण करता आले नाही. हे काम कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या देखरेखीखाली होत असे. त्यांनी घोषणा केली आहे की, नोव्हेंबरपर्यंत २ लाख ३० हजार कर्मचारी आणि २ लाख ८० हजार विद्यार्थ्यांना फ्लू शॉटची आवश्यकता असेल. सीडीसीच्या मते, अमेरिकेत यावर्षी ३९ ते ५६ मिलियनपर्यंत हंगामी फ्लूचे रुग्ण आढळू शकतात. सुमारे ७ लाख ४० हजार लोकांना रुग्णालयाची आवश्यकता असू शकते आणि यामुळे ६२ हजारांपर्यंत मृत्यू होऊ शकतात.