प्रबल इच्छाशक्ती ! 101 वर्षांच्या आजोबांची ‘कोरोना’वर मात, रुग्णालयाने साजरा केला वाढदिवस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भल्याभल्यांची पळताभुई थोडी करणार्‍या कोरोनावर मुंबईतील एका 101 वर्षांच्या आजोबांनी मात केली आहे. ते ज्या रुग्णालयात उपचार घेत होते त्याठिकाणी त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला. गोविंद नारिंगरेकर असे त्यांचे नाव आहे.

कोरोनानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 101 वर्षाच्या या आजोबांनी कोरोनाशी लढा देउन मातही केली. त्यांना मिठाई खाऊ घालत डॉक्टरांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला. या क्षणी उपस्थित असलेल्या रुग्णालय कर्मचार्‍यांनी आणि परिचारिकांनी टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले. देशभरात कोविड योद्धे अर्थात डॉक्टर्स, परिचारिका, रुग्णालय कर्मचारी सातत्याने करत आहेत. अनेकदा नैराश्य, नकारात्मकता ही डॉक्टरांना कोविड योद्धांनाही जाणवू शकते. गेल्या चार महिन्यांपासून हे सगळे याच वातवरणात आहेत. अशा सगळ्यांसाठी असे क्षण हे उभारी देणारे ठरत आहेत. 101 वर्षांच्या आजोबांना कोरोनाची लागण झाली. मात्र डॉक्टरांनी दिलेले उपचार आणि सूचना हे ऐकून, वेळेवर गोळ्या आणि औषधे घेऊन या आजोबांनी कोरोनावर मात केली.