दिल्ली निवडणुकीनंतर भाजपचं महाराष्ट्रात पुन्हा ऑपरेशन ‘लोटस’

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्ली निवडणुकीनंतर भाजप नेतृत्वाच्या टार्गेटवर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश असल्याची सुत्रांची माहिती आहे. दोन्ही राज्यातील गेलेली सत्ता परत मिळवण्यासाठी ‘ऑपरेशन लोटस’ पुन्हा सक्रिय होणार असल्याची चर्चा आहे. यासाठी भाजप साम, दाम, दंड, भेद अशा सर्व शक्तींचा वापर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र त्याआधी राज्यात पर्य़ाय काय यावरून प्रदेश भाजपमध्ये दोन मतप्रवाह असल्याचे सांगितले जातेय. महाराष्ट्रात पुन्हा ‘ऑपरेशन लोटस’ सुरु होणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे.

राज्यातल्या महाविकास आघडीला सत्तेत येऊन तीन महिने पूर्ण होत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येत भाजपला सत्तेपासून दूर ठेवत सत्ता स्थापन केली. तीन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष सत्तेत आल्याने पहिल्या दिवसांपासून पक्षांमध्ये कुरबुरी सुरु असल्याचे पुढे आलंय. त्याचाच फायदा भाजप घेत ठाकरे सरकारविरुद्ध व्ह्युरचना आखत असून राज्य सरकारला धक्का देण्यासाठी तयारी करत आहे. दिल्ली निवडणुकीमुळे हायकमांड व्यस्त असल्याने दिल्लीच्या निवडणुका होताच ‘ऑपरेशन लोटस’ सुरु होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सत्तेसाठी नाराज आमदारांची फोडाफोडी करून बहुमताचा आकडा गाठणं कठीण आहे. राज्यात मध्यावती निवडणुकांना सामोरं जाण्याची सध्यातरी कोणाची मनस्थिती नाही. त्यानंतर पर्य़ाय उरतो तो शिवसेनेला सोबत घेण्याचा किंवा राष्ट्रवादीसोबत हात मिळवणी करण्याचा. मात्र, सुत्रांच्या माहितीनुसार केंद्रीय नेतृत्व शिवसेनेला पुन्हा चुचकारण्यासाठी तयार नाही. तर राष्ट्रवादीसोबत जाण्यास प्रदेश भाजपमध्ये मतभेद आहेत.

भाजपमधला एक गट हा ‘ऑपरेशन लोटस’साठी प्रयत्नशील आहे. राष्ट्रवादी किंवा शिवसेना यापैकी कोणी सोबत येवू शकेल याची चाचपणी करण्यात येत आहे. तर भाजपमधल्या काही नेत्यांना राष्ट्रवादीला सोबत घेऊ नये असे वाटतेय. तर शिवसेनेला सोबत घेण्यास आम्हाला काहीही अडचण नसल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी एका वाहिनीशी बोलताना दिली.