बिल गेट्स यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर मेलिंडा यांना किती मिळाली संपत्ती? जाणून घ्या

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक बिल गेट्स यांनी आपली पत्नी मेलिंडा गेट्स यांच्याबरोबरचे आपले 27 वर्षाचे वैवाहिक जीवन संपुष्टात आणले आहे. गेट्स दाम्पत्याने एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला आहे. बिल गेट्स आणि मिलिंडा गेट्स हे एक मुलगा आणि दोन मुलींचे पालक आहेत. बिल गेट्स यांच्यापसासून वेगळ्या झाल्यानंतर मेलिंडा अब्जाधीश झाल्या आहेत. मागील काही दिवसात त्यांच्याकडे दोन अब्ज डॉलरपेक्षा अधिक रक्कम आली आहे. तसेच बिल गेट्स यांनी स्थापन केलेली सर्वात मोठी कंपनी कॅक्सेड इन्व्हेस्टमेंटमध्ये देखील त्यांना मोठी भागीदारी मिळाली आहे.

बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. मुलाचे नाव रॉरी आणि मुलींचे नाव जेनिफर आणि फिओबी आहे. बिल गेट्स हे जगातील प्रमुख श्रीमंत व्यक्तींपैकी एक समजले जातात. त्यामुळे या घटस्फोटानंतर पत्नीला किती संपत्ती मिळाली असेल याबाबत चर्चा सुरु झाली आहे. तर मेलिंडा यांना बिल गेट्सच्या कॅस्केड इन्व्हेस्टमेंटने मॅक्सिकोच्या दोन सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये शेअर दिले आहेत.

एका वृत्तानुसार, या आठवड्यात कॅस्केड इन्व्हेस्टमेंटने मेलिंडा यांना जवळपास 1.8 अब्ज डॉलर किंमतीचे कॅनेडियन नॅशनल रेल्वे कंपनी आणि ऑटोनेशन इंक कंपनीचे शेअर दिले आहेत. कॅस्केड इन्व्हेस्टमेंटकडे सध्या 50 अब्ज डॉलरहून अधिक मूल्याचे शेअर आहेत. यामध्ये रिपब्लिक सर्व्हिसेस इंक, डीअर अँड कंपनी आणि इकोलॅब इंक यांचा समावेश आहे.

बिल गेट्स यांची एकूण संपत्ती सुमारे 10.87 लाख कोटींच्या घरात असल्याचे सांगण्यात येते. 2017 मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी मुलांना किती संपत्ती मिळणार याबाबत भाष्य केले होते. आपल्या संपत्तीमधून प्रत्येक मुलांना 10 दशलक्ष डॉलर देण्यात येतील. म्हणजे प्रत्येकाला जवळपास 73 कोटी रुपये. बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स हे आपल्या संपत्तीमधील 95 टक्के हिस्सा हा समाजसेवेसाठी खर्च करणार आहेत. त्यासाठी त्यांनी बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनची स्थापना केली आहे.

घटस्फोटानंतर एकत्र काम करणार

बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन ही संस्था देघे मिळून चालवतात. घटस्फोटानंतरही हे दोघे एकत्र काम करणार आहेत. बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे कार्यालय सिएटल येथे आहे. या संस्थेची 2019 मध्ये एकूण संपत्ती 43.3 अब्ज डॉलर इतकी होती.

बिल गेट्स आणि मेलिंडा यांचा विवाह 1994 मध्ये झाला होता. या दोघांची पहिली भेट 1987 मध्ये झाली होती. 27 वर्षाच्या वैवाहिक आयुष्यानंतर विभक्त होण्याचा निर्णय या दोघांनी घेतला. त्याच्या या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान, बिल गेट्स आणि मेलिंडा यांनी एक संयुक्त निवेदन जारी केले होते. नाते टिकवण्याबाबत दीर्घ काळ केलेल्या चर्चेनंतर आम्ही आमचे वैवाहिक जीवन संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला असल्याचे निवेदनात सांगितले होते.