पुण्यात पाणी प्रश्न पेटणार

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन – दिवाळीनंतर पुणे शहराला एकवेळ पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणातील पाणीसाठा आणि भविष्याचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला आहे. याविषयी माहिती पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम यांनी माहिती दिली आहे. सोमवारी पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्यांनी ही माहिती दिली. इतकेच नाही तर या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार असल्याचेही ते म्हणाले.
समोर आलेल्या माहितीनुसार, पुणे शहराला १३५० एमएलडी पाण्यावरून कालवा समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार ११५० एमएलडी देण्याचे मंजूर केले आहे. आता दिवाळीनंतर त्या निर्णयाची अंमलबजावणी  करण्यात येणार असल्याचे समजत आहे. त्यामुळे शहराला एक वेळ पाणीपुरवठा होणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे पुणेकर नागरिकांना पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. या प्रश्नावर भविष्यात पुण्यात पाणी प्रश्न पेटणार हे निश्चित मानले जात असून विरोधक सत्ताधारी भाजपाला कोंडीत पकडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
 
अशी असेल एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी भेट
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या बोनसची घोषणा केली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी २५०० रुपये,तर अधिकाऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची दिवाळी भेट देण्यात येणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी ही घोषणा केली.
मुंबईतील बेस्ट सेवा तोट्यात असली तरी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिली जाते. त्या प्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनाही ती द्यावी, असे निर्देश शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यास अनुमती दिल्यानंतर हा निर्णय झाल्याचे रावते म्हणाले.
आजच्या निर्णयाचा फायदा एसटीचे ३६ हजार ९८३ चालक आणि ३६ हजार ४३५ वाहकांसह १ लाख ७ हजार कर्मचारी, अधिकाऱ्यांना होणार आहे. या निर्णयाने महामंडळाच्या तिजोरीवर ७५ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. (विशेष प्रतिनिधी)