नाथाभाऊनंतर सातारचे राजे राष्ट्रवादीच्या वाटेवर ?

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँगेसमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू असताना आता सातारा येथील भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार शिवेंद्रसिंहराजेही राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. . शिवेंद्रसिंहराजे अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला आल्याने राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवारांची आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी नुकतीच भेट घेतली आहे. या भेटीनंतर शिवेंद्रसिंहराजेंचे सीमोल्लंघन? निश्चित मानले जात आहे. अजित पवार आणि शिवेंद्रसिंहराजे यांची भेट अराजकीय असल्याचे सांगण्यात येत असले तरी ही भेट राजकीय असल्याचे मानले जात आहे. ही बैठक कास धरणाची उंची वाढविण्या संदर्भातल्या पुढील कामकाजाबाबतीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडून ही भेट वैयक्तिक कारणासाठी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात शिवेंद्रसिंहराजेंनी अजित पवारांची भेट घेतली होती. जवळपास तासभर चर्चा झाली. यावर अजित पवार म्हणाले की शिवेंद्रसिंहराजे हे विकास कामासाठी भेटायला आले होते. राजकीय क्षेत्रात अशा भेटी होत राहतात. त्यामुळे या भेटीचा वेगळा अर्थ काढू नका. त्यात काहीही काळबेरं नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पत्रकारांशी बोलताना दिली.