एकनाथ खडसेंच्या मोठ्या निर्णयानंतर खासदार रक्षा खडसेंनी स्पष्ट केली भाजपबाबतची भूमिका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी भाजपला (BJP) सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एकनाथ खडसे हे येत्या शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे. आता एकनाथ खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादीत कोण प्रवेश करणार याची चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, खडसे यांच्या सूनबाई आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे (raksha khadse) यांनीही भाजपबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रक्षा खडसे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, रक्षा खडसे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्या म्हणाल्या, मी भाजपा सोडून जाणार नाही. मी भाजपमध्येच राहणार आहे. एकनाथ खडसे यांनी वैयक्तिक कारणांमुळे भाजपला रामराम ठोकला आहे. मात्र भारतीय जनता पक्षामध्ये मला कोठल्याही प्रकारचा त्रास नाही. त्यामुळे मी भाजपमध्ये राहणार असल्याचे रक्षा खडसे यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी देखील रक्षा खडसे या भाजप सोडणार नसल्याचे सांगितले होते. तसेच तो त्यांचा निर्णय आहे, असेही एकनाथ खडसे म्हणाले होते. त्याचबरोबर आपल्या सोबत एकही आमदार आणि खासदार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार नसल्याचेही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते. एकनाथ खडसे हे येत्या 23 ऑक्टोबरला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहिर केले. शुक्रवारी दुपारी दोन वाजता एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती जयंत पाटील (jayant patil) यांनी पत्रकार परिषदेत दिली. एकनाथ खडसे यांनी सकाळी पक्षाचा राजीनामा दिला अशी माहिती मिळाली असून त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीत घेण्यात कोणतीही अडचण नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.