बिलाचा आकडा ऐकून ‘कोरोना’ग्रस्त रुग्णाने हॉस्पिटलमधून ठोकली धूम, सर्वांना ‘बाधित’ करण्याची दिली धमकी

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आणीबाणीसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून आरोग्य यंत्रणांवर ताण येत आहे. कोरोनावर उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांकडून मोठी बिले आकारली जाण्याचे प्रकार समोर येत आहेत. विरार पश्चिमेकडील विजय वल्लभ रुग्णालयात एक करोनाग्रस्त रुग्ण दीड लाखाचे बिल ऐकून रुग्णालयातून पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे रुग्णालयाच्या सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

विरार पश्चिम भागातील विजय वल्लभ रुग्णालयात 12 जुलै रोजी एक कोरोनाग्रस्त रुग्ण दाखल झाला होता. पाच-सहा दिवस उपचारांनंतर रुग्णाची तब्येत सुधारल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्याच्या निर्णय रुग्णालयाने घेतला. यावेळी आपल्या 5-6 दिवसांच्या उपचाराचे बिल दीड लाखाच्या घरात आल्याचे समजताच, रुग्णाने हॉस्पिटलच्या अधिकार्‍यांशी बोलण्याच्या बहाण्याने रुग्णालयातूनच पळ काढला. डॉक्टरांनी या रुग्णाला फोन केल्यानंतर मी सर्वांना बाधित करेन अशी धमकी रुग्णाने दिली आहे. हॉस्पिटल प्रशासन जास्त बिल आकारत असल्यामुळे हा प्रकार घडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून या रुग्णाचा शोध सुरु आहे.