पुण्यात ‘या’ कारणांमुळे अपघातातील मृत्यूचं प्रमाण घटलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यामध्ये हेल्मेट सक्ती केल्यानंतर अनेकांनी विरोध केला. मात्र हेल्मेट सक्तीमुळे पुण्यातील अपघाताचे प्रमाण घटले आहे. पुण्यात वाहतुक पोलिसांकडून सुरु असलेल्या हेल्मेट सक्तीची कारवाईमुळे पुण्यात अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण २५ टक्क्यांनी कमी झाले आहे. गेल्यावर्षी पुण्यात ९२ जणांचा अपघातात मृत्यू झाला होता. तर यंदा ६९ जणांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षीपेक्षा २३ जणांचे अपघाती मृत्यू कमी करण्यात पुणे वाहतूक पोलिसांना यश आले आहे.

बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लागावी यासाठी पुणे वाहतूक पोलिसांकडून अनेक उपयायोजना आखल्या जात आहेत. पुण्यातील बेशिस्त दुचाकीस्वारांना शिस्त लागावी यासाठी हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त डॉ. के व्यंकटेशम यांनी घेतला. त्यांनी घेतलेल्या निर्णयाला सर्वच स्तरातून विरोध करण्यात आला. हेल्मेट सक्ती विरोधात आंदोलने करण्यात आली. पोलिसांवर दबाव टाकण्यात आला. मात्र पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता हेल्मेट सक्ती सुरुच ठेवली. त्यामुळेच गेल्यावर्षीपेक्षा यंदा अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण घटले आहे.

आयुक्तांनी अपघाती मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश वाहतूक शाखेला दिले होते. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी शहरातील मुख्य चौकात आणि अपघातांची ठिकाणांची निवडली. तसेच महापालिका प्रशासनानाल उपाययोजना करण्यास सांगून अपघातप्रवण क्षेत्रामध्ये बदल करण्यास सुरूवात केली.

वाहतूक शाखेकडून अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची आकडेवारी नुकतीच जाहिर करण्यात आली. या आकडेवारीनुसार गेल्यावर्षी पहिल्या चार महिन्यामध्ये २८६ अपघातांची नोंद झाली आहे. त्यातील ८७ अपघातांमध्ये ९२ जणांना आपले जीव गमवावा लागला आहे. यंदाच्या पहिल्या चार महिन्यात २३७ अपघातांची नोंद झाली आहे. यामध्ये ६९ जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.