आता BMC चा मोर्चा बॉलीवूड अभिनेता सोनू सूदकडे !

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री कंगना राणौत पाठोपाठ आता मुंबई महापालिकेने आपला मोर्चा बॉलीवूड अभिनेता सोनू सूदकडे वळवला आहे. त्याने जुहू येथील रहिवाशी इमारतीमध्ये कोणत्याही परवानगीशिवाय हॉटेल सुरु केल्याचा आरोप करत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी महापालिकेने 4 जानेवारी रोजी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. दरम्यान बीएमसीच्या तक्रारीविरोधात लवकरच आपण मुंबई हायकोर्टात जाणार असल्याचे सोनू सूदने सांगितले.

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने कोरोना संकटाच्या काळात केलेल्या कामाची सर्वत्र चर्चा आहे. लॉकडाऊनमध्ये त्याने अनेक गरीब मजुरांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहचवण्यासाठी मदत केली. सोनू सूदच्या या दर्यादिलीमुळे त्याच्या चाहत्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. त्याच्या मदत कार्यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.त्याला मिळणारी आर्थिक रसद ही भाजपाकडून होत असल्याचा दावा काहीनी केला होता. शिवसेनेनेही सोनू सूदला या कामगिरीवर आक्षेप घेतले होते, त्यावरून भाजपाने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले होते. मात्र आता शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेने सोनू सूद विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

महापालिकेने असा आरोप लावला आहे की, सोनू सूदने जुहू येथील 6 मजली रहिवासी इमारतीत कोणत्याही परवानगीशिवाय हॉटेल सुरू केले आहे. राज्य शहर नियोजन(MRTP) कायद्याखाली बेकायदेशीर बदल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी महापालिकेने केली आहे. मात्र सोनू सूदने याबाबत नकार दिला आहे. आपल्याला बीएमसीकडून परवानगी मिळाली असून महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंटकडून परवानगी मिळणे बाकी आहे. कोरोनामुळे ही परवानगी मिळण्यास उशीर झाला आहे. कोणतेही बेकायदेशीरपणे बांधकामात बदल झाला नाही, हे हॉटेल कोविड योद्धांना संकटकाळात दिले होते. जर परवानगी नसेल तर मी पुन्हा हॉटेलच रहिवाशी बांधकामात रुपांतर करतो, असे त्याने सांगितले.

दरम्यान, सोनू सूदला बीएमसीने ऑक्टोबरमध्ये नोटीस पाठवली होती, या नोटिशीविरोधात त्याने स्थानिक कोर्टात धाव घेतली आहे. परंतु या प्रकरणात अद्याप दिलासा मिळाला नाही. कोर्टाने सोनू सूदला 3 आठवड्यांची मुदत हायकोर्टात जाण्याची दिली होती. ही मुदत संपली त्यानंतर बीएमसीने सोनू सूदविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.