२ वर्षाच्या मुलाचा खून करून पोलिस कर्मचार्‍याच्या पत्नीची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सासुच्या छळाला कंटाळून 2 वर्षाच्या मुलाचा खून करून पोलिस कर्मचार्‍याच्या पत्नीने स्वतः आत्महत्या केल्याची धक्‍कादायक घटना पुण्यातील हडपसर परिसरात शनिवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनास्थळावरून पोलिस कर्मचार्‍याच्या पत्नीची सुसाईड नोट मिळाली असून त्यामध्ये सासु छळ करीत असल्याचे नमुद करण्यात आले आहे.

जान्हवी अमित कांबळे (22) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. जान्हवी या पोलिस कर्मचारी अमित दत्‍तात्रय कांबळे यांच्या पत्नी होत्या. अमित कांबळे हे हडपसर पोलिस ठाण्यातील तपास पथकात (डीबी पथक) कार्यरत आहेत. सासु सुजाता यांच्याकडून वेळावेळी होणार्‍या छळाला कंटाळून जान्हवी यांनी स्वतःच्या मुलाचा खून करून आत्महत्या केली आहे.

आत्महत्या करण्यापुर्वी जान्हवी यांनी सुसाईड नोट लिहीली असुन त्यामध्ये त्यांनी अमित (पती) तू माझ्यावर खूप प्रेम करतोस. मात्र, वेळ देऊ शकत नाही, हे माझे दुर्देव. माझी सासु सुजाता ही माझा वारंवार छळ करते असे नमुद करण्यात आले आहे. शनिवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नीने मुलाचा खून करून आत्महत्या केल्याने अमित यांना धक्‍का बसला आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.