‘लॉकडाऊन’नंतर मोठया शहरात स्वस्त होईल घर खरेदी करणं, पण गुंतवणूकीसाठी लोकांची पहिली पसंत रियल इस्टेटच : सर्व्हे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या कित्येक वर्षांत घरांच्या किंमती गगनाला भिडल्या असून मागणीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घरे बांधली गेली. तरी देखील घरांच्या किंमती कमी होण्याचे नाव घेत नाही. परंतु लॉकडाऊनमुळे परिस्थिती बदलून घरांच्या किंमती खाली येऊ शकतात. लॉकडाऊननंतर मंदी येणार असून त्यामुळे घरांच्या किंमती खाली येण्याची आशा आहे.

एका वृत्तसंस्थेनुसार, बांधकाम क्षेत्राशी संबंधित ९९ एकर्स डॉट कॉम या कंपनीने दिल्ली (एनसीआर), हैदराबाद, बेंगळुरू, पुणे, चेन्नई, चंदीगड, अहमदाबाद आणि लखनऊ येथे सर्वेक्षण केल्यावर त्यात घर खरेदी करण्यासाठी इच्छुक असलेल्या १७६१ लोकांकडून माहिती घेण्यात आली आहे. या सर्वेक्षणात भाग घेतलेल्या जवळपास ९० टक्के लोकांचे म्हणणे आहे की लॉकडाऊननंतर घरांच्या किंमती नक्कीच खाली येतील. म्हणूनच यापैकी ४९ टक्के लोकांनी घर विकत घेण्याच्या योजना अनिश्चित काळासाठी होल्डवर ठेवल्या आहेत. मात्र उर्वरित ६० टक्के लोकांना १ वर्षाच्या आत घर खरेदी करायचे आहे.

घर खरेदीला होल्ड केले गेले
घरांची मागणी, गुंतवणूक क्षमता, घरांच्या किंमतींबद्दल त्यांच्या अपेक्षा आणि या भागातील नवीन ट्रेंडच्या आधारे हे सर्वेक्षण केले गेले आहे. बांधकाम क्षेत्रात निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे आणि लिक्विडीटीच्या अभावी घरांची खरेदी रखडली आहे. याव्यतिरिक्त बांधकाम प्रकल्पांतर्गत घर खरेदी करण्यापेक्षा तयार घरे खरेदी करणे अधिक सुरक्षित आहे, असे सर्वेक्षणात सामील असलेल्या ८५ टक्के लोकांनी म्हटले.

पण रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यात लोकांना अजूनही जास्त रस
सर्वेक्षणात सामील झालेल्या लोकांच्या गुंतवणूकीच्या विविध प्रकारच्या ट्रेंडविषयी प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सर्वाधिक ३१ टक्के लोकांनी रिअल इस्टेटमधील गुंतवणूकीला प्राधान्य दिले आहे. तर २४ टक्के लोकांनी निश्चित ठेव आणि सोन्याच्या खरेदीवर विश्वास व्यक्त केला आणि २१ टक्के लोकांनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास रस दाखवला आहे.