लॉकडाऊननंतर पुण्यात ‘कोरोना’चा ‘विस्फोट’, महिन्यात एवढयांनी वाढला बाधितांचा आकडा, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुण्यात लॉकडाऊन हटवल्यानंतर महिन्याभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. पुणे शहरातील लॉकडाऊन हटवल्यानंतर पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या तिप्पट वाढली तर कोरोनामुळे मृत्यू होण्याची संख्या दुप्पट वाढली आहे. पुणे शहरात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 3 हजारावरून 6 हजारावर गेली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाचे स्थानिक नेतेही पुन्हा टोटल लॉकडाऊनची मागणी करू लागले आहेत. सजग नागरिक मंचाने मात्र या लॉकडाऊनला विरोध दर्शवला असून आता यावरून राजकारण सुरु झाले आहे.

पुण्यात वाढत असलेल्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शहरात टोटल लॉकडाऊन करण्यावरून राजकारणाला सुरुवात झाली आहे. लॉकडाऊन उठताच पुणे शहरात कोरोनाचा उद्रेक झाला. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. प्रशासनाच्या नियामांचे पालन होत नसल्यामुळे आजपर्यंत काही भागापूरताच मर्यादित असलेला कोरोना विषाणूचा संसर्ग आता सर्वत्र पसरला आहे. ज्या भागात कोरोना प्रादुर्भाव कमी होता अशा कोथरुड, कोरेगाव पार्क सारख्या उच्चभ्रू भागात देखील कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी शहरात पूर्णपणे लॉकडाऊन करा अशी मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीला राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे आणि काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी देखील त्यांना पाठिंबा दिला आहे.

राजकीय नेत्यांनी शहरात पूर्णपणे लॉकडाऊनची मागणी केली असली तरी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी पुन्हा लॉकडाऊन करण्यास कडाडून विरोध दर्शवला आहे. लॉकडाऊन हा उपाय होऊ शकत नाही. लोकांनी आणि सरकारने मिळून उपाययोजना केल्या पाहिजेत असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मात्र पुण्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा तुर्तास तरी कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव नेमका थांबवणार तरी कसा ? असा प्रश्न विचारला जात आहे. तर विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला आणखी किती दिवस लॉकडाऊन राहणार असा सवाल केला आहे.