लोकसभेच्या निकालानंतर होणार काँग्रेस-मनसे युती ?

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभेच्या रिंगणात एकही उमेदवार नसताना भाजप आणि शिवसेनेच्या महाआघाडीच्या विरोधात झंझावात निर्माण करणाऱ्या राज ठाकरेंना आघाडीत सामील करून घेण्यासाठी दिल्लीत हालचाली सुरु झाल्या असल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरे यांनी किती मते खाल्ली याचा विचार करून त्यांना आघाडीत घ्यायचे कि नाही, याच्यावर विचार केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

राज यांनी लोकसभेला एकही उमेदवार दिला नव्हता, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडीला राजकीय क्षितीजावरून कायमचे हद्दपार करा, असे सांगत त्यांनी प्रचार सभांचा धडाका लावला होता. “ए लाव रे तो व्हिडीओ” हे वाक्य त्यांच्या प्रचारसभांवेळी फार लोकप्रिय झालं होतं.

लोकसभेला मनसेला सोबत घ्यावे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने मांडली होती. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण,संजय निरुपम यांसह काही नेत्यांनी याला विरोध केला होता. राज ठाकरे यांच्या उत्तर भारतीयांबद्दलच्या भूमिकेमुळे बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये याचा फटका बसेल अशी शंका या काँग्रेस नेत्यांना होती. राज यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीत फायदा तर नक्कीच होणार आहे, फक्त तो नक्की किती झाला हे पाहावे लागेल, अशी बोलकी प्रतिक्रिया काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने दिली.

या सगळ्या घडामोडींचा आढावा घेऊन राज ठाकरे यांना सोबत घ्यायचे कि नाही याचा निर्णय काँग्रेस हायकमांड अर्थात राहुल गांधीच घेतील, असे देखील बोलले जात आहे.

मनसेची विधानसभेतील कामगिरी

मनसेला २००९ च्या विधानसभा निवडणुकीत १३ जागा मिळाल्या होत्या. तेव्हा मनसेने मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकमधील मतदारसंघात विजय मिळवला होता. त्यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणात शिवसेना आणि भाजपची मते खाल्ली होती. मात्र २०१४ च्या निवडणुकीत मनसेचा मोठा पराभव झाला होता. त्यावेळी मनसेचा केवळ एकाच आमदार निवडून आला होता.