‘लोकसभेच्या निकालानंतर मोदी एका कोपर्‍यात चहाची टपरी चालवतील, भजी विकतील !’

बदरूद्दीन अजमल यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर

वृत्‍तसंस्था : देशभरात लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. दि. 11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान देखील झाले. राजकीय पक्षांकडून ऐकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. काही नेते तर खालच्या थराला जावुन आक्षेपार्ह भाषेचा वापर देखील करीत असल्याचे पहावयास मिळते. काँग्रेस असो की भाजपा वादग्रस्त विधानं, जीभ घसरण्याचे प्रकार बहुतांश ठिकाणी होत आहेत. आता या यादीत आसाममधील ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंटचे नेते बदरूद्दीन अजमल यांचे नाव जोडले गेले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची सत्‍ता घालण्यासाठी जी महाआघाडी तयार झाली आहे, त्यामध्ये आमचाही पक्ष आहे. यावेळी आम्ही सगळे विरोधक मिळून मोदींना सत्‍तेबाहेर काढू. त्यानंतर एका कोपर्‍यात मोदींची चहाची टपरी असेल. चहासोबत ते भजीही विकतील, अशी अशोभनीय आणि आक्षेपार्ह टीका बदरूद्दीन अजमल यांनी केली आहे. अजमल यांनी 12 वर्षापुर्वी ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंटची (एआययूडीएच) सुरवात केली होती. सध्या ते आसाममधील धुबरी मतदार संघाचे खासदार आहेत. यापुर्वी भाजपा खासदार उदय प्रताप सिंह यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली होती. यापुर्वी परदेशात गेल्यानंतर भारतीय व्यक्‍तीला चोरांच्या देशातुन आलाय असे संबोधित केले जात होते. मात्र, आता मोदींच्या भारताततुन आल्याचे बोलले जाते. मोदींनी देशाला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. उद्या राहुल गांधी पंतप्रधान झाल्यास, भारताचा पंतप्रधान पप्पू आहे, अशी खल्‍ली उदय प्रताप सिंह यांनी उडवली होती.

एआययूडीएच पक्ष आणि माहिती

खासदार बदरूद्दीन अजमल यांनी दि. 3 ऑक्टोबर 2005 रोजी आसाम युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंट या राजकीय पक्षाची स्थापना केली तर दि. 2 फेब्रुवारी 2009 रोजी आसाम युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंटचे नाव ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंट (एआययूडीएच) असे करण्यात आले. सन 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ‘एआययूडीएच’ या पक्षाचा एक खासदार होता. सन 2011 मध्ये आसाममध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘एआययूडीएच’ पक्षाचे 18 आमदार निवडणुक आले होते. सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ‘एआययूडीएच’ पक्षाचे 3 खासदार निवडुन आले त्यामध्ये बदरूद्दीन अजमल यांचा देखील समावेश आहे. सन 2016 मध्ये आसाममध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘एआययूडीएच’ पक्षाचे 13 आमदार निवडणुक आले आहेत. सध्या ‘एआययूडीएच’ पक्ष हा महाआघाीत राहुन भाजप आणि एनडीए विरूध्द निवडणुका लढवत आहे.