शरद पवार, राज ठाकरे भेटतात, त्यांच्यात गुफ्तगू होतं, मग भाषणाचं स्क्रिप्ट तयार होत : विनोद तावडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ज्या ठिकाणी शरद पवार असतील, त्या ठिकाणी राज ठाकरे पोहचतात. मग दोघांमध्ये गुफ्तगू होतं आणि त्यानंतर राज ठाकरेंच्या पुढच्या भाषणाची स्क्रिप्ट तयार होते, असा टोला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांना लगावला. सोमवारी (दि.१५) सोलापूरमध्ये झालेल्या सभेत ठाकरे यांनी भाजप सरकारवर हल्ला चढवला होता. त्यावर आज (मंगळवार) भाजपकडून विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सोमवारी रात्री राज ठाकरेंच्या टुरींग टॉकिजचा शो पाहिला. राज यांनी ते कोणत्या पक्षाचे स्टार प्रचारक आहेत हे आता जाहीर करावे. राज यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर न देता तावडे म्हणाले की, समज कमी असली की असे आरोप केले जातात, असा टोला त्यांनी लगावला.

विनोद तावडे पुढे म्हणाले, राज यांच्या म्हणण्यानुसार, जर आमच्या योजना फसलेल्या असतील तर ग्रामपंचायत, जिल्हापरिषद, नगरपालिका, महानगरपालिका येथे होणारा भाजपचा विजय आणि मनसेचा गाशा गुंडाळला जाणं हे कशाचे प्रतीक आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

भारतातल्या पहिल्या डिजीटल गावाचे सत्य राज ठाकरे यांनी समोर आणले होते. राज ठाकरेंच्या दणक्यानंतर सरकार बॅक फूटवर गेले आहे. या गावातले जे काही तांत्रिक प्रश्न असतील ते सोडवले जातील, असे आश्वासन विनोद तावडे यांनी दिले.