आईचं ‘छत्र’ हरवल्यानंतर दिवाळीच्या पूर्वसंध्येला ‘लक्ष्मी’सह 3 बहिणींना मिळाला कायमचा ‘आधार’

शांतिवनने घेतले दत्तक

 बीड : पोलीसनामा ऑनलाइन – दीपावली जसा प्रकाशाचा उत्सव तसा लक्ष्मीच्या पुजनाचाही ! वंचितांच्या आयुष्यात आनंदाची प्रकाशज्योत पेटवणाऱ्या शांतिवन प्रकल्पाने आईच्या मृत्यूनंतर एकाकी लक्ष्मी सह तिच्या दोन बहिणींना दत्तक घेत दिवाळी सार्थक केली. या तिन्ही मुली आता शांतिवनात राहणार असल्याची माहिती संचालक दीपक नागरगोजे यांनी दिली.

वंचित उपेक्षित घटकांतील मुलांना शिक्षण देऊन, नोकरी मिळवून देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम शांतिवन प्रकल्पाच्या माध्यमातून दीपक व कावेरी नागरगोजे हे दांपत्य गेल्या दोन दशकांपासून करत आहे. आर्वी (ता. शिरूर) येथील हा प्रकल्प आज राज्यातील मोजक्या उत्कृष्ट सामाजिक प्रकल्पांपैकी एक आहे. वंचित, आधाराची गरज असलेल्या मुलांची माहिती मिळताच शांतिवन त्यांना आसरा देते.दीपावलीच्या पूर्वसंध्येला अशाच तीन मुलींना शांतिवनने आधार दिला.

शिरूर तालुक्यातील तागडगाव येथील तुकाराम आधापुरे यांची पत्नी वैशाली यांचे काही दिवसांपूर्वी आजारपणामुळे निधन झाले. तुकाराम यांना श्रावणी (वय ७), लक्ष्मी (वय ६) आणि आरती (वय ४) या तीन मुली.. आईच्या अकाली निधनाने या तिन्ही मुली उघड्यावर पडल्या. घरची गरिबी, इतरांच्या शेतात काम करून उदरनिर्वाह करणा-या तुकाराम यांच्या समोर मुलींच्या पालन पोषणाचा प्रश्न होता. ही बाब शांतिवनचे दीपक नागरगोजे यांना कळताच त्यांनी या मुलींना शांतिवनात आणून त्यांना आधार दिला.

संपूर्ण पालकत्व स्वीकारले
तुकाराम आधापुरे यांच्या तिन्ही मुलींचे पालकत्व शांतिवनाने स्वीकारले आहे. या मुलींचे प्राथमिक, माध्यमिक ते संपूर्ण उच्च शिक्षण करुन या मुलींना शांतिवन त्यांच्या पायावर उभा करेल दीपक नागरगोजे, संचालक, शांतिवन

Visit : policenama.com