१८ वर्षानंतर रेल्वे मंत्रालयाच्या मागण्यांवर मध्यरात्रीपर्यंत लोकसभेत चालली ‘चर्चा’

विकासाचा मार्ग रेल्वेवरील चर्चेत मध्यरात्री १२ पर्यंत १०० खासदार उपस्थित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेमध्ये नेहमीच गोंधळ, कामकाज तहकुब, निषेध आरडाओरडा अशा बातम्या झळकत असतात. पण, खासदार हे आपल्या भागाच्या विकासाविषयी तितकेच जागरुक असतात, हे गुरुवारी त्यांनी दाखवून दिले. तब्बल १८ वर्षानंतर लोकसभेतील चर्चा मध्यरात्रीपर्यंत चालली. विकासाचा मार्ग रेल्वे मार्गावरुन जातो, असे म्हटले जाते. त्याचे दृश्य रुप लोकसभेत दिसले. रेल्वे मंत्रालयाच्या मागण्यांवरील चर्चेसाठी १०० खासदार मध्यरात्रीपर्यंत लोकसभेत उपस्थित होते.

त्यानंतर रेल्वे राज्यमंत्री सुरेश चन्नबसप्पा अंगदी यांनी सांगितले की, रेल्वे हा एक परिवार आहे. सर्व सदस्यांकडून चांगल्या सूचना मिळाल्या. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात महामार्गांच्या निर्मितीमध्ये महत्वाचे योगदान देण्यात आले. नरेंद्र मोदी तसेच काम रेल्वेबाबत करीत आहेत. या चर्चेत विरोधकांनी रेल्वेच्या खासगीकरणावर सरकारवर जोरदार टिका केली. रेल्वेमध्ये सार्वजनिक खासगी भागीदारी, निगुंतवणुक आणि खासगीकरणाकडे सरकार रेल्वेला घेऊन जात आहे. रेल्वेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा, सुरक्षा, सामाजिक उत्तरदायित्व यावर भर दिला पाहिजे, अशा सुचना मांडण्यात आल्या.

संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी रात्री उशीरापर्यंत कामकाज चालल्याबद्दल सर्वांचे आभार मानत, तब्बल १८ वर्षानंतर मध्यरात्रीपर्यंत बैठक सुरु राहण्याची पहिली वेळ असल्याचे सांगितले.