‘निर्भया’ नंतर कठुआ केसमधील ‘निष्पाप’ बालिकेला मिळणार का न्याय ! नराधमांना कधी होणार फाशी ?

नवी दिल्ली : वृत्त संस्था – काल दिल्लीच्या तिहार जेलमध्ये बहुचर्चित 2012 निर्भया प्रकरणातील चारही दोषींना 20 मार्चला सकाळी साडेपाच वाजता फाशी देण्यात आली. तिहार जेलच्या अधिकार्‍यांनी चारही दोषींना फाशी दिली गेल्यानंतर त्यांच्या मृत्यूची खातरजमा करून घेतली. त्यानंतर दोषी विनय शर्मा, अक्षय ठाकुर, मुकेश सिंह आणि पवन गुप्ता यांच्या मृतदेहांचे पोस्टमार्टम करून ते कुटुंबियांकडे सोपवण्यात आले. आता देशातील लोकांना कठुआ केसच्या निष्पाप बालिकेच्या मारेकर्‍यांना सुद्धा फासावर लटकताना पाहायचे आहे. जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये 2018 मध्ये आठ वर्षीय बालिकेवर सामुहिक बलात्कार, छळ आणि हत्या करणार्‍या 6 दोषींपैकी 3 जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली आहे.

या घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. माजी सरकारी अधिकारी सांजी राम याला या गुन्ह्याचा मास्टर माईंड मानले जात होते. पठाणकोटच्या फास्ट ट्रॅक कोर्टाने रामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याच्यासोबत दोन पोलीस कर्मचार्‍यांना सुद्धा पाच-पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. सांजी राम शिवाय परवेश कुमार, दोन स्पेशल पोलीस ऑफिसर दीपक कुमार आणि सुरेंदर वर्मा, हेड कॉन्स्टेबल तिलक राज आणि सब-इन्स्पेक्टर आनंद दत्ता यांना दोषी ठरवले आहे. पोलीस कर्मचारी पुरावे नष्ट करण्यात दोषी आढळून आले. कोर्टाच्या निर्णयानंतर निष्पाप मृत बालिकेच्या आईने मुख्य आरोपी सांझी रामला फाशी देण्याची मागणी केली होती.

पोलीसांच्या माहितीनुसाऱ, या बालिकेला अनेक दिवस ड्रग्स देऊन बेशुद्ध ठेवण्यात आले होते. तिचे मागच्या वर्षी 10 जानेवारी 2018 ला अपहरण करण्यात आले होते. सुमारे एक आठवड्यानंतर तिचा मृतदेह सापडला होता. या भयंकर प्रकारानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती, लोकांनी रस्त्यावर येऊन आंदोलने सुद्धा केली होती. अख्खा देश या घटनेने व्याकुळ झाला होता. सर्वसामान्य माणसापासून बॉलिवुडच्या सुपरस्टार्सने सुद्धा बालिकेला न्याय देण्याची मागणी केली होती.

या घटनेत काही असे आहे, जे आजपर्यंत कधीही घडलेले नाही. या प्रकरणात ज्या लोकांची नावे समोर आली होती, त्यांच्या समर्थनासाठी काही स्थानिक लोकांनी एक तिरंगा यात्रा काढला होती. ज्यामध्ये भाजपा नेते आणि तत्कालीन पीडीपी-बीजेपी सरकारमधील मंत्री सुद्धा सहभागी झाले होते. लाल सिंह (वन मंत्री) आणि चंद्र प्रकाश (अर्थ मंत्री) यांनी आरोपींची बाजू घेत गोंधळ घातला होता. जनतेने संताप व्यक्त केल्यानंतर या दोन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

आता निर्भयाला न्याय मिळाल्यानंतर कठुआच्या निष्पाप बालिकेला न्याय मिळावा, अशी मागणी देशातील जनता करत आहे. सूंपर्ण देशाला वाटत आहे की, या नराधमांना सुद्धा त्यांचा पक्ष आणि अन्य बाबींचा विचार न करता फासावर लटकवण्यात यावे. परंतु, निर्भयाला न्याय मिळण्यात उशीर झाला, आसिफासोबत असे होऊ नये, असे नागरिकांना वाटत आहे.