गृहिणीचं महिन्याचं बजेट बिघडणार ! कांदा, डाळींनंतर आता साखर ‘कडू’ होणार

नवी दिल्ली : वृत्त संस्था – महागाईमुळे तुमच्या घराचे बजेट आता आणखी बिघडण्याची शक्यता आहे. कारण कांदा आणि डाळीच्या दरवाढीनंतर आता साखर महागणार आहे. ग्राहक मंत्रालयाने म्हटले आहे की, सरकारकडे डाळींचा योग्य साठा आहे. सरकार या साठ्यातून सुमारे ८०५ लाख मेट्रिक टन डाळी बाजारात विकू शकते. यामुळे डाळींच्या किमती आवाक्यात राहू शकतात. परंतु, आता साखरेचे दर वाढण्याची शक्यता आहे.

साखरेचे उत्पादन घटले
देशात साखरेचे उत्पादन यावर्षी १५ डिसेंबरपर्यंत ३५ टक्क्यांपर्यंत घसरून ४५.८ लाख टनावर आले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये उत्पादन घटल्याने असे झाले आहे. साखरेचे बाजार वर्ष ऑक्टोबर ते सप्टेंबरपर्यंत असते. मागच्या वर्षात याच काळात साखरेचे उत्पादन ७०.५ लाख टन होते. १५ डिसेंबर २०१९ पर्यंत ४०६ साखर कारखान्यांमध्ये ऊसाचे गाळप होत होते. मागील बाजार वर्षात १५ डिसेंबरपर्यंत ४७३ कारखाने ऊसाचे गाळप करत होते.

कांदा आणि डाळीचे भाव
केंद्र सरकारने आयात केलेल्या कांद्याचा पहिला साठा मुंबई बंदरात पोहचला आहे. दिल्लीच्या किरकोळ बाजारात लवकरच आयात केलेले कांदे दिसणार आहेत. दरम्यान डाळीच्या किमती वाढल्याने सरकार बफर स्टॉकमधून डाळ विक्रि करण्याच्या तयारीत आहे. यामुळे डाळीच्या वाढलेल्या किमती लवकरच कमी सुद्धा होऊ शकतात.

पावसाचा फटका
पुराच्या पाण्यामुळे यावर्षी महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये साखर उत्पादन मागच्या वर्षीपेक्षा कमी आहे. या दोन्ही राज्यात साखर कारखान्यांनी आपले काम उशीरा सुरू केले होते. आतापर्यंत झालेल्या गाळपामधून मिळालेले उत्पादन हे गेल्यावर्षीपेक्षा खुप कमी आहे. साखर कारखाने पुरात खराब झालेल्या ऊसाचेही गाळप करत आहेत. गुजरातमध्ये १.५२ लाख टन, बिहारमध्ये १.३५ लाख टन, पंजाबमध्ये ७५ हजार टन, तामिळनाडुत ७३ हजार टन, हरियाणात ६५ हजार टन, मध्य प्रदेशात ३५ हजार टन आणि तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात ३० हजार टन साखर उत्पादन झाले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/