कांद्यानं रडवलं आता ‘या’ कारणामुळं खाद्य तेल महागणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत त्यामुळे सामान्यांच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणले आहे. कांदा सामान्यांच्या ताटातून जवळपास अदृश्य झाला आहे. परंतू आता एवढ्यावर भागणार नाही, कारण आता खिशाला आणखी कात्री लागणार आहे. कारण कांद्यानंतर आता खाद्य तेलाच्या किंमतीचा भडका उडण्याची शक्यता आहे. एका वृत्तानुसार मलेशिया आणि इंडोनेशियामधून आयात होणारे पाम तेल महागल्याने देशातील सोयाबीन आणि मोहरीच्या तेलासह इतर तेलाच्या किंमती देखील वाढणार आहेत.

मागील दोन महिन्यात पाम तेलाचे दर 26 टक्क्यांनी वाढेल आहेत. तसेच सरसोच्या तेलात (मोहरीचे तेल) देखील 300 रुपये क्विंटल झाले आहे आणि सोयाबीनचे तेल देखील 400 रुपये प्रति क्विंटल झाले आहे. तज्ज्ञांच्या मते देशात पावसाळ्या दरम्यान जास्त पावसाने खरीप पिके विशेष करुन सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे आणि चालू रब्बी हंगामात तेलबियांची लागवड कमी झाल्याने स्थानिक बाजारात तेल आणि तेलबियाचे दर वाढले आहेत.

खाद्य तेल उद्योग संघटनेचे एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी निदेशक डॉ. बी. व्ही. मेहता यांच्या मते तेलाचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना तेलबियाचा चांगला दर मिळेल. तेल बाजार तज्ज्ञ मुंबईच्या सलील जैन यांनी एका सर्व्हेचे उदाहरण देत सांगितले की नोव्हेंबर महिन्यामध्ये मलेशिया पाम तेलाचा स्टॉक 8.5 टक्क्यांनी कमी होऊन 21.5 लाख टन झाल्याचा अंदाज आहे. ते म्हणाले की तेल आणि तेलबियांचे दर येणाऱ्या दिवसात आणखी वाढण्याची शक्यता आहे.