आपल्याच ‘रणनीती’मध्ये ‘फसला’ पाकिस्तान, दोन्ही आघाड्यांवरील लढाईत झाला ‘हतबल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकचे पंतप्रधान इम्रान खान सुरूवातीला कोरोना व्हायरसला साधारण फ्लू सांगत होते. या महामारीशी लढण्याची त्यांची रणनीती सुरूवातीपासून भ्रामक होती. लॉकडाऊनवरून लष्कर आणि सरकारमधील मतभेदही समोर आले. लष्कराने लॉकाडाऊन लावला तर कट्टर इस्लामिक गटांनी तो मानण्यास नकार दिला. नंतर सरकारला त्यांच्या मागणीपुढे झुकावे लागले. आज येथे प्रत्येक 100 टेस्टमध्ये 23 लोक संक्रमित आढळत आहेत. इम्रान खान यांची रणनीती होती की, कोरोना व्हायरसच्या लढाईत अर्थव्यवस्थेची बिघडलेली स्थिती आयसीयूमध्ये जाऊ नये. परंतु सरकार दोन्ही आघाड्या सांभाळण्यात अयशस्वी झाले.

पाकिस्तानने ईदीच्या सणापूर्वी 9 मे राजी शिथिल असलेला लॉकडाऊनही हटवला. आर्थिक संकटाचा विचार करता पाकिस्तान सरकार अगोदरपासूनच लॉकडाऊनच्या बाजूने नव्हते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले की, संसर्गाच्या वाढत्या प्रकरणात आणि त्यामुळे होणार्‍या मृत्यूंनंतरही देशाला व्हायरससोबत राहाणे शिकावे लागेल. जेणेकरून लोकांच्या उपजीविकेवर संकट येणार नाही. देशात सक्तीने लॉकडाऊन लागू न केल्यामुळे इम्रान खान यांच्यावर टीका देखील करण्यात आली. परंतु, त्यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, कोरोनापासून वाचण्यासाठी लोकांना उपासमारीमुळे मरू देणार नाही.

लॉकडाऊन हटवल्यानंतर पाकिस्तानमध्ये कोरोना व्हायरसच्या महामारीचा कहर वाढत चालला आहे. न्यूज एजन्सी रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारी डेटावरून हे दिसते की, लॉकडाऊन हटवण्यापूर्वी पहिल्या तीन आठवड्यात 20,000 प्रकरणे सापडली होती. परंतु, लॉकडाऊन उघडल्यानंतर तीन आठवड्यांच्या आत याच्या दुप्पट रूग्ण समोर आले आहेत.

संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांच्या मागील कारण टेस्टिंगचे प्रमाण वाढवणे हे सुद्धा आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान रोज करण्यात येत असलेल्या चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह प्रकरणांची सरासरी 11.5 टक्के होती, तर लॉकडाऊन हटवल्यानंतर तीन आठवड्यात ती सरासरी 15.4 टक्के झाली आहे. डेटानुसार या आठवड्यात वेग 23 टक्के झाला आहे.

जॉर्जटाऊन युनिव्हर्सिटीच्या डिपार्टमेंट ऑफ इंटरनॅशनल हेल्थचे रिसर्च प्रोफेसर क्लॅर स्टॅनले यांनी सांगितले की, ही संख्या चिंताजनक आहे, कारण यातून समजते की, देशाच्या काही भागात व्यापक प्रमाात कोरोनाचा संसर्ग पसरला आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, धार्मिक स्थळ, शॉपिंग एरिया किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी गर्दी रोखणे आणि सोशल डिस्टन्सिंग लागू करण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. तरच वाढत्या रूग्ण संख्येला आळा घालता येईल. अनेक पाकिस्तानी डॉक्टरांनी सुद्धा इशारा दिला आहे की, लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याची तीव्र गरज आहे.

रॉयटर्सनुसार, पाकिस्तानच्या सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या पंजाब राज्यात आरोग्य विभाग आणि एक्सपर्ट कमेटीकडून सरकारला एक पत्र पाठवण्यात आले आहे, यामध्ये लॉकडाऊन जारी ठेवण्याची मागणी केली आहे. पत्रात म्हटले आहे की, रँडम टेस्टिंगमधून हे संकेत मिळतात की, लाहोरमध्ये 6,70,000 पेक्षा जास्त लोक कोरोना बाधित होऊ शकतात. यापैकी बहुतांश एसिम्प्टोमॅटिक आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये कोणतेही लक्षण दिसत नाही.

पंजाबच्या आरोग्य मंत्री यासमीन राशिद यांनी म्हटले की, पत्राकडे दुर्लक्ष करण्यात आलेले नाही. परंतु, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता की, लॉकडाऊन हटवण्यात यावा. त्या निर्णयानुसार सरकार अर्थव्यवस्था हळूहळू खुली करत आहे.

कोरोना व्हायरसचे रूग्ण वेगाने वाढत असतानाच पाकिस्तानात आरोग्य सुविधा कमी असल्याने महामारीला आणखी संधी मिळत आहे. यंग डॉक्टर्स असोसिएशनचे जनरल सेक्रटरी सलमान काजमी यांनी सांगितले की, लाहोरच्या बहुतांश हॉस्पिटलमध्ये जागा नसल्याने आता आम्ही रूग्णांना मेयो हॉस्पिटलमध्ये पाठवत आहोत. मेयो हॉस्पिटलमध्ये कोविड-19 च्या प्रकरणांसाठी 400 पेक्षा जास्त बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. मेयोचे सीईओ असद असलम यांनी हा दावा नाकारला की, लाहोरची सर्व हॉस्पिटल रूग्णांनी भरली आहेत. ते म्हणाले, आम्ही अजून अनेक रूग्णांना सांभाळू शकतो.

पाकिस्तानने ईदच्या दोन आठवडे अगोदर 9 मे रोजी लॉकडाऊन हटवला होता. पाकिस्तानमध्ये ट्रान्सपोर्ट आणि बहुतांश व्यवसाय सुरू झाले आहेत. परंतु, सिनेमा, थिएटर आणि शाळा अजूनही बंद आहेत. पूर्ण जगात ही चर्चा सुरू आहे की, मोठ्या लोकसंख्येचे विकसनशील देश विनाआर्थिक नुकसानीने लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंग लागू करू शकतात का?

विकासनशील देशांची अर्थव्यवस्था पूर्णपणे बंद ठेवल्याने त्यांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. यामध्ये पाकिस्तानसह भारताचाही समावेश आहे. मात्र दुसरीकडे प्रतिबंध शिथिल केल्यास संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत. काही अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, विकासनशील देशांमध्ये हार्ड इम्युनिटी विकसित झाल्यास व्हायरसला रोखता येणे शक्य आहे. हार्ड इम्युनिटी एक अशी परिस्थिति आहे, ज्यामध्ये बहुतांश लोकसंख्येत संसर्गाच्या विरोधात रोग प्रतिकारकशक्ती विकसित होईल आणि यांच्या संसर्गापासून लोक वाचू शकतील. जागतिक आरोग्य संघटनेने हार्ड इम्युनिटी बनवण्यासाठी लॉकडाऊन लागू न करणे किंवा सोशल डिस्टन्सिंगमध्ये शिथिलता देणार्‍या देशांना सावध केले आहे.

युरोपीय युनियनच्या एका अधिकार्‍याने म्हटले की, पाकिस्तानचे सरकार सुद्धा एक मोठा जुगार खेळत आहे. परंतु, ही हार्ड इम्युनिटीची एक टेस्ट केससुद्धा होऊ शकते. कारण दक्षिण आशियाजवळ अन्य पर्याय नाही. लॉकडाऊनचे कडक प्रतिबंध हटवण्याच्या बाजूने बोलणारे लोक सुद्धा पाकिस्तानचे रस्ते, शॉपिंग मॉल्स आणि मशिदीतील गर्दी पाहून चिंताग्रस्त आहेत. येल युनिव्हर्सिटीमध्ये अर्थशास्त्राचे प्रोफेसर अहमद मुशफिक मुबारक यांनी म्हटले की, पूर्ण लॉकडाऊन कारणे किंवा अर्थव्यवस्था खुली करण्यापैकी एक पर्याय निवडणे सोपे नाही.