सर्वसामान्यांना पुन्हा बसणार फटका; पेट्रोल-डिझेलनंतर आता वाढणार कांद्याचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत असताना आता कांदा रडवणार आहे. कारण आता कांद्याचा भाव वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. या भाववाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे. दिल्लीच्या ठोक बाजारात कांद्याचा दर 50 रुपये प्रतिकिलोवर गेला आहे.

कांद्याचा भाव वाढल्यास सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. भाववाढीनंतर कांद्याचा भाव 65 ते 75 रुपये प्रतिकिलोवर गेला आहे. गेल्या दीड महिन्यात कांद्याचा भाव दुप्पटीने वाढला आहे. तसेच आशियातील सर्वात जास्त कांद्याचा बाजार लासलगावात होतो. देशभरात नाशिकच्या लासलगावातून कांद्याची निर्यात केली जाते. ठोक बाजारात गेल्या दोन दिवसांत भाव सुमारे 970 रुपये प्रति क्विंटल वाढून 4200 पासून 4500 रुपयांवर गेला आहे.

दरम्यान, गोरखपूरमध्ये कांद्याचा भाव 45 ते 48 रुपये, गुजरातच्या भावनगर येथून येणारा कांदा 40 रुपये आणि बंगालमधून येणारा कांदा 25 रुपये प्रतिकिलोच्या हिशोबाने ठोक भावात विकला जात आहे.

…म्हणून महाग झाला कांदा

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाला होता. त्यामुळे काद्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. ठोक बाजारात कांद्याची आवक कमी झाली होती. त्यामुळेच आता कांद्याच्या भावात वाढ झाली आहे. इतकेच नाही तर डिझेलचे दर वाढल्याने माल भाड्यातही वाढ झाली आहे. त्यामुळेच सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. त्याचा फटका ग्राहकांना बसणार आहे.