मध्य प्रदेशात राजकीय ‘भूकंप’ पण ट्विटरवर महाराष्ट्राचा ‘डंका’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मध्यप्रदेशचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह काँग्रेसच्या १९ आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर आज दिवस भर सोशल मीडिया वर महाराष्ट्रातही असे राजकीय भूकंप बसण्याची चिन्ह आहेत अशी चर्चा होती. त्यामुळं ट्विटर वर ‘महाराष्ट्र’ (Maharashtra) हा शब्द बराच वेळ टॉप ट्रेंडमध्ये होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. त्याच्यासोबत किमान दीड डझन आमदारांनी पक्षाला सोडचिट्टी दिल्यामुळे मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकार कोणत्याही क्षणी पडू शकते. कर्नाटक नंतर मध्यप्रदेशात ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी होत असताना महाराष्ट्रातील भाजप समर्थकांना आपला उत्साह आवरला नाही. आता महाराष्ट्राकडे भाजप आपला मोर्चा वळवणार असल्याचे अंदाज व्यक्त होऊ लागल्याने काही काळ सोशल मीडियावर मध्यप्रदेश हा ट्रेंड बाजूला पडून महाराष्ट्राची चर्चा सर्वत्र सुरु झाली.

महाराष्ट्रात भाजप हा सर्वात मोठा पक्ष असूनही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी भाजपाला सत्तेपासून रोखलं आणि महाविकास आघाडीचं सरकार आणलं. वेगवेगळ्या विचारांचे सरकार हे लवकरच कोसळेल या आशेवर भाजप होता. मात्र अलीकडेच महाविकास आघाडी सरकारने आपले १०० दिवस पूर्ण केले. मात्र सरकार स्वतःहून पडेल याची वाट न पाहता ‘ऑपरेशन लोटस’ राबविले जाईल अशी चर्चा होत होती. मध्यप्रदेशातील झालेल्या घडामोडीनंतर या चर्चेला पुन्हा उधाण आलं आहे.

https://twitter.com/prayag_sonar/status/1237272232956579840

ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिलेल्या राजीनाम्याची बातमी येताच “महाराष्ट्र” असे ट्विट करण्याचे प्रमाण वाढले. काही वेळातच २३ हजारांहून अधिक ट्विट आणि रिट्विट करण्यात आले. हे ट्विट करण्यात भाजप समर्थक आघाडीवर होते. मोदी-शहा यांनी केलेल्या राजकीय कौशल्याचे ट्विटही सुरु होते. तसेच महाराष्ट्राबरोबर राजस्थान मध्येही ‘ऑपरेशन लोटस’ राबिविले जाणार अशा प्रकारची ट्विट हि सोशल माध्यमात फिरत होती.