Pune News : राज ठाकरेंचा चांगला निर्णय, मी देखील अयोध्या दौर्‍यावर जाणार – देवेंद्र फडणवीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मार्च महिन्यात अयोध्या दौरा करणार आहेत. ठाकरे यांच्या या दौऱ्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, ते म्हणाले की, राज ठाकरे यांचा निर्णय चांगला आहे, सगळ्यांनीच अयोध्येला गेले पाहिजे, मी सुद्धा अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे हे कृषी विधेयकाविरोधात उपोषणाच्या तयारीत आहेत. त्यामुळे अण्णांच्या मनधरणीसाठी फडणवीस हे पुन्हा एकदा राळेगणसिद्धीला गेले आहेत. यावेळी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी हे सुद्धा उपस्थित आहेत. यादरम्यान फडणवीस यांना माध्यमांनी विविध प्रश्न विचारले. त्यावेळी फडणवीस यांनी ठाकरे यांच्या अयोध्या दौ-यावर भाष्य केले.

फडणवीस म्हणाले, अण्णांशी गेल्या आठवड्यापासून आमची चर्चा सुरु आहे. आजच्या बैठकीत काही मार्ग निघेल असे आम्हाला वाटते. त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टींवर निर्णय देखील घेतले आहेत. त्यांनी उपोषणाला बसावे असे कोणालच वाटत नाही. तसेच लोकल सेवा टप्याटप्याने सुरु केली पाहिजे. विशेषत: खासगी क्षेत्रातील नोकरवर्गाला ही सेवा नसल्याने खूप त्रास होतो आहे. त्यामुळे त्याच्या टायमिंग संदर्भात विचार केला पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.

दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे 1 मार्च ते 9 मार्च दरम्यान एका दिवशी अयोध्येला जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. मनसेची आगामी निवडणुकांच्या तयारीबाबतची बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नांदगावकर बोलत होते.