अत्याचार करून अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – पतीला चांगली नोकरी मिळवून देतो असे सांगून, आयटीत काम करणाऱ्या विवाहित महिलेवर बलात्कार करून, त्याची अश्लील चित्रफीत तयार करून ती सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देऊन पीडित महिलेला खोलीत कोंडून ठेवल्याची घटना डांगे चौकात घडली. हा प्रकार १२ नोव्हेंबर रोजी घडला असून तब्बल एक महिन्यानंतर दाखल झाला आहे.

याप्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तर किरण कृष्णा भालेकर (४२, रा. वडगाव शेरी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे लग्न झाले असून ती एका आयटी कंपनीत काम करत आहे. तिच्या पतीमुळे किरण याची तिच्याशी ओळख झाली. त्या ओळखीचा गैरफायदा घेत त्याने पीडितेच्या नव-याला चांगले काम मिळवून देतो असे आमिष दाखवले. त्यानंतर महिलेला डांगे चौकातील एका हॉटेलवर बोलावून घेतले. तिथे त्याने ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’ असे म्हणत तिच्याशी लैंगिक संबंध ठेवण्याची मागणी केली. तसेच त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवल्यास मूल होणार असल्याचे सांगत महिलेशी जवळीक करून बलात्कार केला. त्याने याचे चित्रीकरण केले.

घडलेल्या प्रकाराबाबत कोणास काही सांगितले तर चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडित महिलेला बराच वेळ हॉटेलच्या खोलीत डांबून ठेवले. मात्र आणखी काही होऊ नये म्हणून पीडित महिलेने तिच्या पतीला घडलेला प्रकार सांगितला. त्यांनतर वाकड पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. तपास वाकड पोलीस करीत आहेत.

तरुणाची एक लाखाची फसवणूक

पिंपरी : जहिरातवरुन संपर्क झालेल्या तरुणाला हॉटेल व्यवसायात जास्तीचा नफा मिळून देण्याच्या बहाण्याने एक लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २२ जुलै ते चार ऑगस्ट २०१८ या कालावधीत घडला.

या प्रकरणी जाफर फकीर सय्यद (रा. गणेशम सोसायटी पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर अरुण वेदप्रकाश मल्होत्रा (रा. कोरेगावपार्क, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्होत्रा याने हॉटेल व्यवसायात जास्त नफा मिळवून देण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली. ती जाहिरात वाचून सय्यद यांनी मल्होत्राला फोन केला. त्यावेळी त्यांना भेटून भागीदारीमध्ये हॉटेल व्यवसाय करू असे सुचवले. सय्यद यांना जास्त नफ्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून एक लाख रुपये घेतले. त्यानंतर हॉटेल व्यवसाय न करता त्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करून फसवणूक केली. तपास सांगवी पोलीस करीत आहेत.