समाजामध्ये ‘कसं’ राहावं ? ‘हा’ अभंग नक्की वाचा, सर्व काही समजेल

पोलीसनामा ऑनलाइन टीम –

पापाची वासना नको दावू डोळा। त्याहुनि आंधळा बराच मी ।।१।।
निंदेचे श्रवण नको माझे कानी । बधीर करोनी ठेवी देवा ।। २ ।।
अपवित्र वाणी नको माझ्या मुखा । त्याहूनी मुका बराच मी ।।३।।
नको मज कधी परस्त्री संगती । जनातून माती उठता भली ।।४।।
तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा । तू एक गोपाळां मज आवडसी ।। ५।।

जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगातून आपल्या डोळे, कान, नाक, म्हणजे माणसाच्या शरीरातील प्रत्येक अवयवाला खूप मोलाचा सल्ला दिला आहे. महाराज म्हणतात, हे देवा ! माझी दृष्टी निर्मळ ठेव. माझ्या डोळ्यांना वाईट गोष्टी पाहू देवू नको. त्यापेक्षा आंधळेपण बरे, माणसाला वाईट कृत्य करण्यात भागीदार पाडण्याचा सगळ्यात मोठा वाटा डोळ्यांचा आहे.

कोणाची निंदा ऐकण्यापेक्षा तू मला बहिरा ठेव. माझ्या मुखातून कधीही अपवित्र वाणी बाहेर पडू देवू नको, त्यापेक्षा मी मुका झालेला बरा. मला कधीही परस्त्री ची संगत करण्याची पाळी येवू देऊ नको; एक वेळ मी मरण पत्करेन पण परस्त्रीसंग करणार नाही.

हे देवा मला या साऱ्या वाईट गोष्टीचा कंटाळा आलेला आहे, एक तू मात्र मला सदैव आवडतोस. मला तुझी भक्ती प्रिय आहे. तुझीच भक्ती करण्याची मला सद्बुद्धी दे. पापकर्म, दूष्टकृत्य, परस्त्रीसंग, अभद्रवाणी, परनिंदा या गोष्टी मनुष्याला अधोगतीकडे घेवुन जाणार्‍या आहेत. मनुष्याने आपले मन स्वच्छ, निर्मळ, प्रसन्न, आनंदी, व देवाच्या भक्तीत ठेवण्याचा सदोदित प्रयत्न केला पाहिजे, असे जगद्गुरू संत तुकाराम महाराज या अभंगाद्वारे आवर्जून सांगतात.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/