जम्मू-काश्मीर : सुटकेनंतर 7 महिन्यांनी मुलगा उमर यांच्याशी भेटून ‘भावूक’ झाले फारूक अब्दुल्ला

श्रीनगर : वृत्तसंस्था – मागील सात महिन्यापासून नजरकैदेत असलेले नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूक अब्दुल्ला हे शनिवारी त्यांचा मुलगा उमर अब्दुल्ला यांना श्रीनगरच्या जेलमध्ये भेटले. यादरम्यान दोन्ही नेते भावुक झाले होते.

माजी मुख्यमंत्री फारूक जनसुरक्षा कायद्यांतर्गत (पीएसए) कैद संपल्यानंतर शुक्रवारी आपल्या घराजवळील हरी निवास येथे पोहचले, येथे मुलगा तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना पीएसए अंतर्गत पाच फेब्रुवारीपासून नजरकैदेत ठेवले आहे. यादरम्यान दोन्ही नेत्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. अधिकार्‍यांनी म्हटले की, फारूक (82) यांनी जम्मू-काश्मीर प्रशासनाला मुलाला भेटण्याची विनंती केली होती, जी प्रशासनाने स्वीकारली. अधिकार्‍यांनी म्हटले की दोघांची सुमारे एक तास भेट झाली.

केंद्र सरकारने मागच्या वर्षी पाच ऑगस्टला तत्कालीन जम्मू-काश्मीर राज्याचा विशेष दर्जा काढून घेतला, ज्यानंतर फारूक अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला आणि एक आणखी माजी मुख्यमंत्री तथा पीडीपी अध्यक्षा महबूबा मुफ्ती यांना ताब्यात घेतले होते.

यानंतर 15 सप्टेंबरला फारूक यांच्याविरूद्ध पीएसएअंतर्गत प्रकरण दाखल केले गेले, तर त्यांचा मुलगा उमर यांची कैद पाच फेब्रुवारीला संपली, परंतु त्याच्या काही तास अगोदर पुन्हा सहा महिन्यांनी कैद वाढवण्यात आली.