संजय राऊतांनंतर कॉमेडीयन कुणाल कामरानं घेतली खा. सुप्रिया सुळेंची भेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यानं काही दिवसांपूर्वीच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे या भेटीदरम्यान संजय राऊत यांची ‘शटअप या कुणाल’ या पॉडकास्टमधील मुलाखतही पार पडली. या मुलाखतीवेळी कुणालनं राऊतांना खेळण्यातील जेसीबी देऊन त्यांचं स्वागत केलं होतं. याचा फोटोही सोशलवर व्हायरल झाला होता. यानंतर आता कुणाल कामरा यानं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे.

कुणालनं सुप्रिया सुळेंची भेट घेतल्यानंतर आता अनेकांना असा प्रश्न पडला आहे की, कुणालनं सुप्रिया सुळेंचीही मुलाखत घेतलीये का ? सुळेंनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून या भेटीचा फोटो शेअर करत विथ कुणाल कामरा असं लिहलं आहे. त्यामुळं सुप्रिया सुळे आणि कुणाल कामरा यांची भेटही चर्चेचा विषय ठरणार हे नक्की.

मुलाखतीची सोशल मीडियावर चर्चा

‘शटअप या कुणाल’ या पॉडकास्ट कार्यक्रमाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. कुणालकडून थेट, उपरोधिक आणि मजेशीर शैलीत विचारले जाणारे प्रश्न या कार्यक्रमाचं आकर्षण असतं. त्यामुळं त्याच्या मुलाखतींची कायमच सोशलवर चर्चा पहायला मिळते. राऊतांच्या भेटीनंतरही ही चर्चा पहायला मिळाली.