ज्योतिरादित्य शिंदेंच्या ‘टायगर अभी जिंदा है’ला दिग्विजय सिंग यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मध्यप्रदेशात काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून भाजपच्या कंपूत दाखल झालेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांचा वरचष्मा दिसला. तसेच त्यानंतर बोलताना ज्योतिरादित्य यांनी माजी मुख्यमंत्री कमलनाथ व काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांना ‘टायगर अभी जिंदा है’ असं सांगत इशारा दिला होता. आता दिग्विजय सिंग यांनी सुद्धा वाघाच्या शिकारीला जाण्याचा किस्सा सांगत ज्योतिरादित्य यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्तारानंतर मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ व काँग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंग यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता ज्योतिरादित्य यांच्या टीकेला दिग्विजय सिंग यांनी प्रत्युत्तर देत तीन ट्विट केले आहे. त्यातून वाघाच्या शिकारीपासून ते भाजपात आणखी किती वाघ तयार होणार येथेपर्यंत समाचार घेतलेला दिसतोय.

पहिल्या ट्विटमध्ये दिग्विजय सिंग म्हणतात, “जेव्हा शिकार करण्यावर बंदी नव्हती. तेव्हा मी आणि श्रीमंत माधवराव शिंदेंजी वाघाची शिकार करायचो. इंदिरा गांधी यांनी वन्यजीव संरक्षण कायदा आणल्यानंतर मी आता फक्त वाघाचे फोटो काढत असतो,” असं त्यांनी म्हटलं.

तर दुसऱ्या ट्विटमध्ये दोन वाघांचा फोटो शेअर करत वाघाच्या स्वभावाविषयी सांगताना,”वाघाचा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे. एका जंगलात एकच वाघ राहतो,” असं ते म्हणाले.

तसेच दिग्विजय सिंग यांनी तिसऱ्या ट्विट मध्ये मंत्रिमंडळ विस्तारावरुन टीका केली आहे. यामध्ये त्यांनी शिवराज सिंह चौहान आणि ज्योतिरादित्य यांच्यातील आरोप प्रत्यारोपांचा व्हिडीओ ट्विट करत म्हटलं आहे की, “वेळ सर्वात शक्तीशाली आहे. भाजपाचे भविष्य… या मंत्रिमंडळ विस्ताराने भाजपाचे किती वाघ जिवंत केले आहेत, माहिती नाही आता पाहत रहा.”

काय बोलले होते ज्योतिरादित्य शिंदे ?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर पत्रकारांशी बोलताना ज्योतिरादित्य शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री कमलनाथ व काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांना पहिल्यांदाच उत्तर देताना म्हटलं होत की, “मला कमलनाथ वा दिग्विजय सिंग यांच्याकडून कोणतंही प्रमाणपत्र नकोय. त्यांनी १५ महिन्यांच्या काळात राज्याला लूटलं आहे. त्यांनी सगळ काही स्वतःसाठी केलं. पण मी त्यांना सांगू इच्छितो की, टायगर अभी जिंदा है,” असं ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले होते.