शत्रुघ्न सिन्हानंतर आता राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याची ब्यारिस्टर जीनांवर स्तुतीसुमने

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जिनांची स्तुती केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. असे असतानाच मोहम्मद अली जिना यांची स्तुती करणाऱ्यांमध्ये आता आणखी एका नेत्याची भर पडली आहे. मोहम्मद अली जिनांचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान असल्याचे राष्ट्रवादीचे नेते माजीद मेमन यांनी म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

‘भारताच्या स्वातंत्र्यात आणि प्रगतीत काँग्रेसमधील जवाहरलाल नेहरूंपासून मोहम्मद अली जिना यांचे योगदान असल्यामुळे मी काँग्रेस पक्षात आलो आहे’, असे वादग्रस्त विधान शत्रुघ्न सिन्हा यांनी शनिवारी केले होते. यावर सिन्हा यांचे वक्तव्य काँग्रेसच्या विचारसरणीवर आधारित आहे अशी टीका भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी केली होती.

शत्रुघ्न सिन्हा यांची पाठराखण करताना मेमन यांनी अमित शहांवरही निशाणा साधला. मेमन म्हणाले की , ‘आज शत्रुघ्न सिन्हा यांच्या विधानावरून वाद निर्माण केला जात आहे. सिन्हा यांना देशद्रोही म्हटलं जात आहे. शत्रुघ्न सिन्हा हे गेली अनेक वर्ष भाजपमध्ये होते. जर ते असं बोलले असतील तर ती त्या पक्षाची शिकवण आहे. आणि जिना यांचे स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान आहे. फक्त ते मुसलमान आहेत म्हणून तुम्हाला सिन्हांचे वक्तव्य खटकत आहे. ‘

काय म्हणाले होते शत्रुघ्न सिन्हा

‘काँग्रेस हा महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, मोहम्मद अली जीना आणि जवाहरलाल नेहरु यांचा पक्ष असून देशाचे स्वातंत्र्य आणि विकासामध्ये त्यांचे महत्वाचे योगदान आहे. काँग्रेसने देशासाठी मोठे योगदान दिल्यानेच मी काँग्रेसमध्ये आलो आहे. यानंतर पुन्हा कुठेही जाणार नाही. असं विधान शत्रुघ्न सिन्हा यांनी छिंदवाडा येथील सभेत केले होते.