‘शुभकल्याण’ नंतर ‘मातृभूमी’ कंपनीने ठेवीदारांना घातला गंडा

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन – मातृभूमी ग्रुप ऑफ कंपनीच्या अंतर्गत असणारी मातृभूमि इन लि. कंपनीने कळंब तालुक्यातील 224 जणांची 86 लाख 91 हजारांची फसवणूक केली आहे. शुभकल्याण मल्टीस्टेट पाठोपाठ आता मातृभूमीने ही कळंब येथील नागरिकांना गंडा घातला आहे. याप्रकरणी चेअरमनसह चार जणांविरुद्ध चिपळून पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. चेअरमन प्रदीप रविंद्र गर्ग, संजय हेमंत बिश्वास, मिलिंद अनंत जाधव आणि विनोदभाई पटेल अशी गुन्हा दाखल झालेल्या मातृभूमीच्या संचालकांची नावे आहेत. याच कंपनीत एजंटचे काम करणारे अरविंद सदानंद मोरे यांनी दिनांक १९ जून २०१९ रोजी चिपळूण पोलीस (रत्नागिरी) ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली.

विविध जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी एजंटची नेमणूक करून गुंतवणूकीवर १२ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून ठेवी गोळा करण्यात आल्या. एजंटला गुंतवणुकीवर ५ टक्के व्याज, मेडीक्लेम पॉलिसीच्या १०० रूपयांच्या गुंतवणुकीवर अपघात झाल्यास २० हजार आणि मृत्यू झाल्यास ८० हजार रूपये देण्याचे आमिष कंपनीकडून दाखविण्यात आले होते. ठेवीदारांनी यामध्ये गुंतवणुक केली होती. मात्र, गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतर पैसे मिळत नसल्याने ठेवीदारांनी संचालकांकडे संपर्क साधला. त्यावेळी कंपनी अडचणीत असून पैसे मिळण्यास वेळ लागेल असे सांगण्यात आले. कालांतराने मुख्य कार्यालय ठाणे सह उस्मानाबाद येथील शाखा बंद पडली. या संदर्भात पोलीस अधीक्षक उस्मानाबाद या सह विविध ठिकाणी तक्रार देण्यात आली आहे. मात्र याची अद्यापही कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही.

मातृभूमी ग्रृप ऑफ कंपनीच्या अंतर्गत १० हून अधिक कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यामध्ये मातृभूमी इन लि, मातृभूमी रियलटेक डेव्हलपमेंट लि, मातृभूमी एक्झॉटिक हॉस्पिटीलीटी, मातृभूमी डेअरी प्रा ल़ि, मातृभूमी फार्म अ‍ॅण्ड रिसोर्टस प्रा लि, मातृभूमी टूर्स अ‍ॅण्ड हॉलिडेज, मातृभूमी इन्शुरन्स सर्व्हिसेस प्रा ल़ि, मातृभूमी पब्लिकेशन्स, मातृभूमी फाऊंडेशन, मातृभूमी फॅब्रिकेशन्स आदींचा समावेश आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील २२४ लोकांनी मातृभूमि इन लि. मध्ये ८६ लाख ९१ हजारांची गुंतवणूक केलेली आहे. मात्र आता हे पैसे कधी मिळतील का नाही असा प्रश्न या ठेवीदारांना पडला आहे.

Visit – policenama.com