अग्रिमा जोशुआला बलात्काराची धमकी देणार्‍या इम्तियाज शेखला मुंबई पोलिसांकडून अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ हिला छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यावरुन थेट बलात्काराची धमकी देणार्‍या इम्तियाज शेख तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी स्वत:च तक्रार दाखल करुन घेत इम्तियाजला ताब्यात घेतले आहे. अटकेच्या कारवाईबद्दल मुंबई पोलिसांनीच ट्विटवरुन माहिती दिली आहे.

इम्तियाज शेख सोशल मिडियावर उमेश दादा या नावाने अकाउंट चालवतो. याच अकाउंटवरुन त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याप्रमाणी जोशुआबद्दल अपशब्द वापरत, अश्लील भाषेत तिला बलात्काराची धमकी दिली होती. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सुमोटो पद्धतीने तक्रार दाखल करुन घेत अपमानजनक, धमकी देणारा व्हिडिओ सोशल मिडियावर अपलोड करुन शेअर करणार्‍या उमेश दादा नावाने अकाउंट असणार्‍या व्यक्तीला अटक केली आहे. भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फोटोवर मुंबई पोलिसांनी, महिलांना धमकी द्याल तर तरुंगात जाल अशा ओळी पोस्ट केल्या आहेत.