तब्बल 11 वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर ‘ते’ दोघे ठरले ‘निर्दोष’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कल्याण येथील दोन शेजाऱ्यांनी तब्बल 11 वर्षे सात महिन्यांचा तुरुंगवास भोगल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांची सर्व आरोपांतून पूर्णपणे निर्दोष मुक्तता केली आहे. उमेश पडवळ आणि जगन्नाथ गोडसे अशी या शेजाऱ्यांची नावे असून ज्ञानेश्वर मानभाव या तरुणाचे अपहरण करून खून केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

उमेश व जगन्नाथ हे दोघे शेजारी काटकर चाळीत राहत होते. नाशिक जिल्ह्याच्या पेढ तालुक्यातील कायरे सदरपाडा येथील ज्ञानेश्वर मानभाव या बेरोजगार तरुणाचे अपहरण करून खून केल्याच्या खटल्यात कल्याण येथील सत्र न्यायालयाने या खटल्यात जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. नंतर उच्च न्यायालयानेही ती शिक्षा कायम केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरवले आहे. न्या. एन. व्ही. रमणा, न्या. मोहन शांतनागोदूर व न्या. अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

खोटे पुरावे पोलिसांनी तयार केले –

संपूर्ण साक्षीपुराव्यांचा साकल्याने विचार करता अपहरण आणि खून हे गुन्हे याच आरोपींनी केले असा निष्कर्ष काढण्याएवढे पुरावे जुळत नाही. तसेच मुरबाडजवळच्या गोरक्षगडाच्या दरीत एका झाडावर दुर्गम ठिकाणी अडकलेले ज्ञानेश्वरचे प्रेत उमेशने दाखविल्याचे खोटे पुरावेही बाजारपेठ पोलिसांनी तयार केले, जुलै 2002 मध्ये अटक झाल्यापासून तब्बल 11 वर्षे सात महिने तुरुंगात राहिल्यानंतर ऑगस्ट 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या दोघांना प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली होती. अशा प्रकारे संपूर्ण तारुण्य ‘खुनी’ म्हणून नासविल्यानंतर न्यायसंस्थेने उमेशला आता वयाच्या 38 व्या व जगन्नाथला 35 व्या वर्षी मोकळे सोडले आहे. हा संपूर्ण खटला परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित होता असे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना सांगितले आहे.

काय आहे प्रकरण –

मयत ज्ञानेश्वर हा विवाहित पण बेरोजगार होता. त्याचे मामा जयराम धूम कल्याणमध्ये काळा तलाव परिसरात राहत होते. त्यांना उमेश हा कारखान्यात नोकरी लावून देतो अशी माहिती मिळाल्यावर त्यांनी उमेशची भेट घेतली होती. नोकरी लावण्यासाठी उमेशने जयराम यांच्याकडे 60 हजार रुपये मागितले. उमेशला देण्यासाठी ज्ञानेश्वर गावावरून पैसे घेऊन आला. यानंतर उमेश ज्ञानेश्वरला वाशिंदला कंपनीत घेऊन जातो, असे सांगून सोबत घेऊन गेला. तो परततलाच नाही. मामा जयराम यांनी उमेशकडे चौकशी केली. कंपनीतून परत येताना रेल्वे स्टेशनवर ज्ञानेश्वर न सांगता कुठेतरी गेला, असे उमेशने त्यांना सांगितले. त्यामुळे ज्ञानेश्वर बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदविली गेली व नंतर उमेश व जगन्नाथ यांच्यावर फसवणूक, अपहरण व खुनाचा खटला दाखल करण्यात आला. अटक झाली तेव्हा उमेश 20 तर जगन्नाथ 18 वर्षांचा होता.