मोबाईल कॉलच्या दरात 25 % पर्यंत वाढ ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोबाइलवर बोलणं लवकरच महागण्याची शक्यता आहे. कारण मोबाइल कॉलच्या दरात 20 – 25 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दूरसंचार कंपन्यांकडून थकीत रक्कम वसुली प्रक्रिया सुरु झाल्याने तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर थकीत रक्कम भरण्यासाठी दूरसंचार कंपन्या लवकरच कॉलच्या दरात वाढ करु शकते असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे.

दूरसंचार विभाग वोडाफोन, आयडिया कंपन्यांकडून थकीत रक्कम वसूल करण्याची तयारी करत आहे. यासाठी कंपन्यांना लवकरच पत्र पाठवण्यात येईल. उच्च न्यायालयाने दूरसंचार कंपन्यांना 24 जानेवारीपर्यंत 1.47 लाख कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश दिले होते परंतु कंपन्यांनी पुन्हा एकदा न्यायालयाकडे मुदतवाढ मागितली होती.

न्यायालयाने याला संमती दिली होती. तसेच यावर सुनावणी करण्यास परवानगी दिली होती परंतु थकीत रक्कम भरु नका असे न्यायालयाने सांगितले नव्हते. या आठवड्यात जर न्यायालयाने या प्रकरणी सुनावणी केली नाही तर कंपन्यांना पत्र पाठवण्यात येईल असे दूरसंचार विभागाच्या सूत्रांनी सांगितले. दूरसंचार विभागाच्या मते 15 कंपन्यांवर एजीआर वसूल करणे शिल्लक आहे. यातील काही कंपन्या तर बंद झाल्या आहेत.

एजीआरची रक्कम भरून काढण्यासाठी दूरसंचार कंपन्या मोबाइल रिचार्जच्या शुल्कात 25 टक्क्यांपर्यंत वाढ करु शकतात, अशी भीती दूरसंचार तज्ज्ञांनी व्यक्त केली. हे दर वाढल्यास ही दरवाढ दोन महिन्यातील दुसरी दरवाढ ठरेल. 1 डिसेंबर 2019 रोजी दूरसंचार कंपन्यांनी आपल्या रिचार्जमध्ये 50 टक्क्यांनी वाढ केली होती. तसेच डिस्काऊंट आणि सूट रद्द केली होती. जर कंपन्यांनी टॅरिफ व्हाऊचरमध्ये 10 टक्क्यांनी दरवाढ केली, तर त्या कंपन्यांना 3 वर्षात 35 हजार कोटी रुपये मिळतील असा अंदाज आहे.

जिओने बाजारात प्रवेश केल्यापासून या कंपन्यांचे नुकसान होत आहे. सरकारी आकडेवारीनुसार एअरटेलवर 35,586 कोटी रुपयांची थकबाकी आहे, यातील 21,682 कोटी रुपयांचे परवाना शुल्क आहे. तर 13,904.01 कोटी रुपयांचे स्पेक्ट्रम प्रयोग शुल्क शिल्लक आहे.

वोडाफोन-आयडिया प्रकरणात एकूण 53,038 कोटी रुपयांची थकबाकी आहे. यात 24,729 कोटी रुपयांचे स्पेक्ट्रम वापरण्याचे शुल्क आणि 28 हजार 309 कोटी रुपयांचे परवाना शुल्क थकीत आहे. रिलायन्स जिओने 31 जानेवारी 2020 पर्यंतचे एजीआरची सर्व रक्कम 195 कोटी दूरसंचार विभागात भरली आहे.

You might also like