3 लाख घेतल्यानंतरही हाव सुटलेला लेखा परीक्षक 50 हजारांची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुण्यातील हडपसरमधील पुलाखाली रात्री सापळा रचून कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खासगी लेखा परीक्षकाच्या ऑडीटमध्ये त्रुटी काढून फौजदारी कारवाई न करण्यासाठी ३ लाख रुपयांची लाच घेतल्यानंतरही हाव सुटलेल्या लेखा परीक्षकाला ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. भगवंत नारायण बिडगर (वय ५६, लेखा परीक्षक श्रेणी १) असे अटक केलेल्याचे नाव आहे.  बिडगर हे सहकारी संस्था कार्यालयात जिल्हा विशेष लेखा परीक्षक आहे.

याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देणारेही प्रमाणित खासगी लेखा परीक्षक आहे. संस्थेच्या नेमणुकीनुसार त्यांनी एका सहकारी पतसंस्थेचे ऑडीट केले होते. त्या ऑडिटमध्ये त्रुटी काढून त्यामध्ये तक्रारदार यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची धमकी दिली. फौजदारी कारवाई करु नये, यासाठी बिडगर याने ३ लाख ७५ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी ३ लाख रुपये अगोदर लाच घेतली होती.

त्यानंतरही उरलेले ७५ हजार रुपये देण्यासाठी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे तगादा लावला होता. तक्रारदारांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यांच्या पडताळणी बिडगर याने ५० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार त्यांनी पैसे देण्यासाठी शनिवारी रात्री हडपसर येथील पुलाखाली तक्रारदार यांना बोलावले होते. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी हडपसर येथील पुलाखाली सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून ५० हजार रुपये स्वीकारताना बिडगर याला पकडण्यात आले. हडपसर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.