विधानपरिषदेची ‘निवडणुक’ घोषित होताच जयंत पटालांची फडणवीसांवर बोचरी ‘टीका’ (व्हिडीओ)

सांगली :  पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यातील रिक्त झालेल्या विधानपरिषदांच्या जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक घेण्याचे जाहीर केले आहे. विधान परिषद निवडणूक जाहीर झाल्यानंतर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. काही तथाकथित लोक लोकशाहीच्या गळचेपीबद्दल राज्यपालांना पत्र देत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत देव पाण्यात घालून बसले होते, मात्र त्यांच्या प्रश्नांना निवडणूक कार्यक्रमामुळे उत्तर मिळाले आहे, असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे लगावला आहे.
राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून राजकीय संघर्ष सुरु होता. सहा महिन्याच्या आत उद्धव ठाकरे यांची आमदारपदी निवड होऊ शकली नाही तर मुख्यमंत्री पद धोक्यात येण्याची शक्यता होती. तर सध्या राज्यात कोरोनाचा फैलाव जास्त असल्याने सरकार कोरोनाविरुद्ध लढा देत आहे. असे असताना उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून निर्माण झालेला पेच प्रसंग आता दूर झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने 21 मे रोजी राज्यातील 9 विधान परिषदेच्या जागेच्या निवडणूका घेण्यास परवानगी दिली आहे.

त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय नाट्यावर पडदा पडला आहे. तर जाहीर झालेल्या या निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री यांनी समाधान व्यक्त केले आहे. निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी आपण केंद्रीय निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याची मागणी केली होती. सोशल डिस्टन्स आणि कोरोनाची खबरदारी घेऊन निवडणुका पार पाडल्या जातील अशी विनंती करण्यात आली होती, असे सांगत जयंत पाटील यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्ष टीका केली आहे.