‘मरकज’ प्रकरणाबाबत मोदी सरकारनं घेतली ‘ही’ महत्वपूर्ण भूमिका

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  कोरोना संसर्गाने जगभरात धुमाकूळ माजवला असताना भारतात देखील कोरोना संसर्गाचा प्रसार वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मात्र, एकीकडे कोरोना संसर्ग रोखण्याच आव्हान देशासमोर असताना लॉकडाऊन च्या काळात निजामुद्दीन भागात तबलिगी समाजाचे मुख्यालय असलेल्या मरकजमध्ये धार्मिक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमामुळे देशभरात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत झाल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण मुस्लीम समाजालाच टार्गेट करण्यात आलं. मात्र, आता मोदी सरकारने याबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

देशात लॉकडाऊन करण्यात आले असताना देखील दिल्लीतील मरकज येथे मार्च मध्ये झालेल्या तबलिगी समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात चीनसह ६८ देशातील तब्बल २०४१ परदेशी नागरिक सहभागी झाले होते. तसेच देशातील १८ राज्यातील १४५१ जणांचा सहभाग होता. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या तब्बल १००० च्या वर नागरिकांना कोरोना संसर्गाची लागण झाल्याचे कळताच देशभरात मोठी खळबळ उडाली होती. त्यांनतर मुस्लिम समाजावर सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात येत होती. याची दखल घेत केंद्र सरकारच्या वतीने एक पत्रक काढून आदेश जारी करण्यात आला आहे. या पत्रकामध्ये कोरोना संसर्गाचा प्रभाव वाढण्यासाठी कोणत्याही समाजाला किंवा ठिकाणाला दोषी ठरवू नये, असें आवाहन केंद्र सरकाराच्या वतीने केलं आहे.

शरद पवारांनी केली होती मोदींकडे मागणी.

कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानांकडे मरकजवरून सुरु असलेल्या वादाबाबत चर्चा केली. यात त्यांनी बोलताना “समाजातील काही घटक, सोशल मीडिया आणि मीडियाच्या माध्यमातून आपत्तीच्या परिस्थितीमध्ये जातीयतेचा रंग देत असून, दोन समाजामध्ये भेदभाव व द्वेषाची भावना निर्माण करण्याचे प्रकार होत आहे. तरी अशा शक्तींचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी” शरद पवार यांनी केली होती.

तसेच पंतप्रधानांसोबत झालेल्या चर्चेनंतर शरद पवार यांनी प्रसार माध्यमांनाही याबाबत आवाहन केलं होत. ‘मीडियाला देखील विनंती आहे की एखादी गोष्ट पुनःपुन्हा प्रसिद्ध करून समाजामध्ये द्वेष निर्माण होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी,’ असें शरद पवार म्हणाले.