निवडणुकांनंतर ‘चौकीदार’ तुरुंगात असेल : राहुल गांधींचं खळबळजनक वक्तव्य

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – राफेलमधील चोरी मोठी आहे. आम्ही सत्तेवर येताच राफेल घोटाळ्याची चौकशी करू आणि चौकीदार तुरुंगात असेल, असा इशारा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिला. नाना पटोले (नागपूर) व किशोर गजभिये (रामटेक) या काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारसभेत राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केले. काँग्रेस सत्तेत आल्यास दहा दिवसांत शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल, अशी घोषणाही राहुल यांनी यावेळी केली.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात प्रचार सुरू केला असून नागपूर येथे पहिली सभा घेतली. राहुल गांधी यांनी राफेल घोटाळा, काही निवडक उद्योजकांचे कर्ज माफ करण्यावरून पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. राफेलवरून टीका करताना राहुल गांधी म्हणले की, ‘राफेल करारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:च वाटाघाटी करून बोलणी करण्याची प्रक्रियाच नष्ट केली. आम्ही सत्तेवर येताच राफेल घोटाळ्याची चौकशी करू आणि चौकीदार तुरुंगात असेल. चौकीदार अनिल अंबानी यांची चौकीदारी करीत आहेत. मोदी फ्रान्सच्या राष्ट्रपतींना भेटून राफेलचे दर वाढवतात आणि त्याचे कंत्राट अनिल अंबानी यांना देण्यास सांगतात. त्यामुळे कुठलाही अनुभव नसलेल्या अनिल अंबानींना फायदा मिळवून दिला.

मोदी जनतेला मित्रो.. असे संबोधतात आणि अनिल अंबानींना अनिल भाई, मेहुल चौक्सीला मेहुल भाई, नीरव मोदीला नीरव भाई आणि विजय मल्याला विजय भाई म्हणतात. मल्या देशाबाहेर पळून जाण्यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतो. गरीबांना पैसे देण्याची वेळ येते तेव्हा भाजपचे लोक पैसे कोठून येतील, अशी विचारणा करतात. पण निवडक उद्योजकांना पैसे देताना असा प्रश्न त्यांना का पडत नाही. तेव्हा भाजप कोणाच्या बाजूने आहे ते तुम्हीच ठरवा, असे राहुल गांधी म्हणाले. पूर्वी मोदी ‘मी देशाचा चौकीदार’ आहे, असे सांगायचे आता आपण सर्व चौकीदार आहोत असे सांगतात.