धक्कादायक ! मोबाईलबाबत विचारणा केल्यानंतर मुलीनं वडिलांच्या अन्नात कालवलं ‘विष’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   मोबाईलमुळे मुलांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ होत असल्याचे अनेक घटनांवरुन दिसून आले आहे. व्हॉटसटॅप, कॉलिंग, गेम खेळण्यसाठी अनेक कुटूंबातील मुले मोबाईलच्या आहारी गेली आहेत. मोबाइलमुळे अशीच एक धक्कादायक घटना भंडारामध्ये घडली आहे. मुलीकडे अचानक मोबाइल आला कसा? याबाबत वडिलांनी तिला विचारणा असता मुलीने जेवणात विष कालवल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे घडली आहे.

नववीत शिकणार्‍या मुलीकडे मोबाइल आढळल्याने वडिलांनी तिला विचारणा केली. याचा राग आल्याने मुलीने जेवणात विष कालवले आहे. हे विषयुक्त जेवण खाल्ल्याने मुलीच्या बहिणीची प्रकृती बिघडल्याने तिला भंडारा येथील रुग्णालयात दाखल केले आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुलीचे आई-वडील मोलमजुरी करतात. त्यांच्या मुलीकडे त्यांना अचानक मोबाइल आढळला. मोबाइलबद्दल त्यांनी विचारले असता तिने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. एवढंच नाही तर वडिलांसोबत हुज्जत घातली. त्यानंतर ती घरातून बाहेर गेली. सायंकाळी ती पुन्हा घरी आली. या वेळी आईवडील घराच्या छतावर बसले होते. हीच संधी साधून मुलीने जेवणात विष कालवले होते. दरम्यान, तिच्या बहिणीला भूक लागल्याने तिने जेवण खाल्ले. घरात उग्र वास येत असतानाही बहिणीने त्याकडे दुर्लक्ष करून जेवण केले. नंतर तिला मळमळ आणि उलट्या झाल्या. त्यानंतर वडिलांनी तिला भंडारा येथील रुग्णालयात दाखल केले. मुलीला याबाबत विश्वासात घेऊन विचारणा केली असता हा धक्कादायक प्रकार तिने सांगितला आहे.