पालघरनंतर आता कोकण पदवीधर; शिवसेना -भाजप आमनेसामने

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला पराभूत करण्यात अपयश आल्यानंतर आता शिवसेनेने कोकण पदवीधर मतदारसंघात आपला उमेदवार जाहीर करुन पुन्हा एकदा भाजपला आव्हान दिले आहे.

विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत ठाणे शहराचे माजी महापौर संजय मोरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. पालघर प्रमाणेच कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शिवसेनेनी यापूर्वी लढवलेली नाही.

येत्या २५ जून रोजी होणा-या या निवडणुकीच्या तोंडावर निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये उडी घेतली. मागीलवेळी शिवसेनेने डावखरे यांना आतून मदत केल्याने भाजपाचा परंपरात मतदारसंघात पराभव झाला होता. पण आता परिस्थिती बदलेली आहे.  पालघरच्या पराभवाने डिवचली गेलेली शिवसेना थेट आव्हान देण्याच्या पवित्र्यात आहे. त्यामुळे मागीलवेळी डावखरे यांना साथ देणाºया शिवसेनेसोबत त्यांना दोन हात करावे लागणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसनी त्यांचा उमेदवार अद्याप जाहीर केलेला नसला तरी त्यांचा उमेदवार असणार हे निश्चित आहे़ त्यामुळे कोकण पदवीधरची निवडणूक तिरंगी होणार हे स्पष्ट दिसत आहे. परिणामी या निवडणुकीतही शिवसेना आणि भाजपामध्ये जोरदार संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी भाजपाचे संजय केळकर यांचा पराभव केला होता. त्यावेळेस डावखरे यांना २७ हजार, केळकर यांना २२ हजार मते पडली होती. डावखरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला असल्याने साहजिकच पुन्हा मुख्यमंत्र्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

वसंत डावखरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जिव्हाळ््याचे संबंध होते. मात्र बाळासाहेबांच्या पश्चात झालेल्या ठाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रवींद्र फाटक यांना उमेदवारी देऊन वसंत डावखरे यांना पराभूत केले होते. आता त्यांचे पुत्र निरंजन यांच्या विरोधातही शिवसेनेने आपला उमेदवार दिला आहे़

पालघरच्या निवडणुकीमुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संबंधांमध्ये काहीसा दुरावा निर्माण झाला असताना आता कोकण पदवीधरमध्ये पुन्हा खडाखडी होणे अपरिहार्य आहे. शिवसेनेची ठाण्यात ताकद आहे. त्यामुळे ही लढत पुन्हा एकदा चर्चेचा विषय होण्याची शक्यता आहे़