‘त्या’ निवडणुकीच्या निकालानंतर युतीचा निर्णय

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी निवडणुकांसाठी युती, आघाडी करण्याच्या राजकीय हालचालींना पाच राज्यांच्या निकालानंतर वेग येईल. मला वाटते भाजप आणि शिवसेना या दोघांचेही लोकसभा आणि विधानसभा जागावाटप आताच निश्चित झाले पाहिजे. याबाबत शिवसेना आणि भाजपमध्ये सातत्याने चर्चा सुरू आहे. पण शिवसेना याबाबत १५ डिसेंबरनंतर भूमिका घेईल, असे मत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. ते कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, दोन्ही पक्ष युती करण्याच्या मानसिकतेत असतात, तेव्हा विद्यमान जागा आपल्याला घ्याव्यात असा निष्कर्ष निघतो. तसे झाले तर लोकसभेच्या जागावाटपाचे काम सहा जागांसाठी असल्याने ते तुलनेने सोपे होईल. पण विधानसभेच्या जागावाटप ९५ जागांसाठी असल्याने त्यामध्ये अडचणी येऊ  शकतात. भाजप-शिवसेना युती करायचीच आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचा कोणत्याही प्रकारे फायदा होऊ नये, अशी इच्छा असेल तर जागावाटप  समजुतीने होऊ  शकेल. शिवसेना पाच राज्यांमध्ये जो काही निकाल लागेल त्यावर निर्णय करेल, असे वाटते.

सांगलीत उसदरासाठी सांगलीत आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले की, साखर कारखानदारांनी एफआरपीची रक्कम दिलीच पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. मात्र आता शेतकरीही आपला ऊस शेतातून साखर गाळपासाठी गेला पाहिजे या मानसिकतेत आहे. त्यामुळे कारखानदार आणि राजू शेट्टी यांनी एकत्र बसून व्यवहार्य तोडगा काढावा. मात्र आंदोलनामध्ये कायदा हातात घेतला गेला तर प्रशासन गप्प बसणार नाही. कडक कारवाई करू, असा इशारा पाटील यांनी दिला. उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात शहरांचे नामांतर केले जाणार आहे का, या प्रश्नावर पाटील म्हणाले, उस्मानाबाद आणि औरंगाबादची नावे बदलली पाहिजेत अशी सरकारची भूमिका आहे. परकीयांची चिन्हे लागली आहेत, ती पुसली पाहिजेत, असे माझे मत आहे. राज ठाकरे याच्या व्यंगचित्रांनी सरकारला घायाळ केले आहे, याबाबत तुमची प्रतिक्रिया काय, असे विचारले असता पाटील म्हणाले, त्यांना आधी माझ्यासोबत महाराष्ट्राचा दौरा करावा. महाराष्ट्रात कोणतीच विकास कामे झाली नाहीत, असा दावा त्यांनी त्यानंतर करावा.