CM योगी यांच्यानंतर आता PM मोदी यांना फोनवर मारण्याची धमकी, आरोपी अटकेत

नवी दिल्ली : गुरूवारी एक व्यक्तीने दिल्ली पोलिसांना कॉल करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची धमकी दिल्यानंतर दिल्ली पोलिसांची मोठी धावपळ उडाली. तत्काळ पोलिसांची सर्व युनिट सक्रिय झाली आणि कॉलरला ट्रेस करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. काही वेळातच पोलीस कॉलरपर्यंत पोहचले आणि त्याला ताब्यात घेतले. जेव्हा पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली तेव्हा तो दारूच्या नशेत होता आणि नशेतच त्याने पोलिसांना कॉल केला होता.

दारू प्यायलेल्या या व्यक्तीचे नाव नितिन असून तो दक्षिणपुरी परिसरात राहतो. पोलीस अधिकार्‍याने सांगितले की, त्यांना कॉल करणार्‍या कॉलरने सांगितले होते की, तो दक्षिणपुरी परिसराच्या ब्लॉक-18 मधील घर क्रमांक -198मधून बोलत आहे आणि पंतप्रधान मोदी यांची हत्या करणार आहे. ज्यानंतर तत्काळ आंबेडकर नगर पोलीस ठाण्याच्या टीम सक्रिय झाली आणि कॉलरला ट्रेस करण्यात आले. आरोपी व्यक्ती पूर्णपणे नशेत होता आणि नशेतच त्याने फोन केला होता. सध्या पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.

सीएम योगी यांना दोन वेळा आली धमकी
पंतप्रधान मोदी यांच्या अगोदर युपीचे सीएम योगी यांना दोनवेळा फोनवर जीवे ठार मारण्याची धमकी मिळाली आहे. चार दिवसांपूर्वी डायल 112 वर ठार मारण्याची धमकी देणारा मॅसेज आला होता. यानंतर पोलीस अलर्ट झाले आणि आरोपीचा शोध सुरू केला. धमकी देणारा आरोपी अल्पवयीन होता, ज्याने मॅसेजमध्ये अपशब्दांचा वापर केला होता. पोलिसांनी आरोपीला सुशांत गोल्फ सिटी ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली होती. चौकशीनंतर पोलिसांनी बालसुधार गृहात पाठवले.