दिल्लीत आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर शेतकऱ्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. यामध्ये शेतकऱ्यांनी थेट पोलिसांवरच हल्ला चढवल्याने या आंदोलनावर आता टीका केली जात आहे. असे असताना आता शेतकऱ्यांनी याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने कृषी कायदे मागे घेईपर्यंत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारने कृषी कायद्याची घोषणा केल्यापासूनच शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. शेतकरी नेते आणि सरकार यामध्ये अनेकदा चर्चा होऊनही तोडगा न निघाल्याने शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यातच काल (ता.26) आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. यामध्ये 300 पेक्षा अधिक पोलिस जखमी झाले आहेत. त्यानंतर आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांना संबोधित करून आंदोलन शांततेत सुरु ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

आंदोलन सुरुच राहणार

कृषी कायद्याविरोधात सुरु असलेले हे आंदोलन यापुढेही सुरुच राहणार असल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले. तसेच काही लोकांनी शांततापूर्ण आंदोलनाला बदनाम केले.

शीख समाजाचा ध्वज फडकविणे चुकीची बाब

दरम्यान, ज्यांनी लाल किल्ल्यावर तिरंग्याऐवजी शीख समाजाचा ध्वज फडकाविला ही चुकीची बाब आहे, असेही संयुक्त मोर्चाच्या काही शेतकरी नेत्यांनी सांगितले.