‘कोरोना’च्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाने सज्जता वाढवावी : खा. अ‍ॅड. वंदना चव्हाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या दुसर्‍या टप्प्याचा विचार करता खबरदारी घेण्यासाठी खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी आयुक्तांना निवेदन देऊन सूचना केल्या आहेत. तसेच आपतग्रस्त परिस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्‍वासित केले आहे.

देशाच्या अनेक भागात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. दिल्लीमध्ये मर्यादित प्रमाणात लॉकडाउनला सुरुवात झाली आहे, तर मुंबई – ठाण्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय तेथील महापालिकांनी घेतला आहे. पुण्यातील परिस्थितीही झपाट्याने बदलत आहे. गेल्या पंधरा दिवसांत शहरात रोज सरासरी २१० रुग्ण सापडत होते. मात्र, १३ ते १७ नोव्हेंबरदरम्यान रोज सरासरी १४० रुग्णांची नोंद झाली. परंतु, १८, १९ आणि २० नोव्हेंबरला अनुक्रमे ३८४, ४११ आणि ३७३ नवे रुग्ण सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कमी झालेली रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे महापालिकेला आता पुन्हा उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.

महापालिकेने काही दिवसांपूर्वी कोविड केअर सेंटर्स टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. तसेच महापालिकेच्या आदेशानुसार खासगी रुग्णालयांनीही त्यांच्याकडील कोविड वॉर्ड बंद केले आहेत. महापालिकेने अधिग्रहीत केलेली रुग्णालयेही पुन्हा खुली झाली आहेत. परंतु, कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढत राहिली तर ऐनवेळी प्रशासनाची धावपळ होण्याची शक्यता आहे. तसेच डॉक्टर, परिचारिका आणि अन्य संबंधित कर्मचारी यांची उपलब्धता, औषधांचा पुरेसा साठा आदींचे नियोजन करण्याची गरज आहे. त्यासाठी महापालिकेने आत्तापासूनच समग्र नियोजन करावे. त्यासाठी आराखडा तयार करावा आणि तत्पूर्वी लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घ्यावे.

शहरात कोरोनाचा उद्रेक होऊ नये आणि लॉकडाउनसारख्या उपायांना कोणालाही सामोरे जावे लागू नये, अशीच सर्वसामान्यांची इच्छा आहे. त्यासाठी महापालिकेने आत्तापासूनच आराखडा तयार करून अंमलबजावणीची दिशा निश्‍चित करण्याची गरज आहे. त्यासाठीची प्रक्रिया तातडीने सुरू करून पुणेकरांना आश्‍वस्त करावे. त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस महापालिका प्रशासनाला सहकार्य करेल, असेही अ‍ॅड. चव्हाण यांनी आश्‍वासित केले आहे.