दोघांच्या प्रेमाला विरोध करणे पालकांच्या आले आंगलट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – प्रेमाला वयाची अट नसते मात्र हीच अट ज्यावेळी प्रेमाच्या आड येते त्यावेळी होत्याचे नव्हते होऊन जाते. असाच एक प्रकार हवेली तालुक्यातील बहुली गावात घडला आहे. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. या दोघांना लग्न करुन सुखी संसार थाटायचा होता. मुलाच्या घरच्यांनी या लग्नाला परवानगी दिली. मात्र मुलाच्या आणि मुलीच्या वयामध्ये अंतर असल्याने मुलीच्या घरच्यांनी या लग्नाला विरोध केला. यामुळे नैराश्य आल्याने मुलीने आत्महत्या केली. मुलीच्या घरच्यांनी मुलाच्या घरच्यांवर गुन्हा दाखल केला.

मुलीच्या घरचे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी मुलाच्या घरच्यांकडे गुन्हा मागे घेण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी कली. तसेच पैसे दिले नाहीत तर खडी फोडायला जेलमध्ये पाठवण्याची धमकी दिली. त्यांच्या या त्रासामुळे मुलाने देखील आत्महत्या केली. आता मुलाच्या वडिलांनी मुलीचे आईवडील, भाऊ, चुलते यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. दोन्ही कुटुंबांनी एकमेकांवर गुन्हे दाखल केले असले तरी त्यांची दोन मुले ते गमावून बसले आहेत. बहुली गावात घडलेला हा प्रकार सर्वांनाचेच मन हेलावून टाकणारा आहे.

उत्तरनगर पोलिसांनी दिलीप पंढरीनाथ कांबळे (वय ५८, रा़ बहुली, ता़ हवेली) यांच्या फिर्यादीवरुन नथू लक्ष्मण भगत, पुष्पा नथू भगत, अविनाश नथू भगत, हरिभाऊ लक्ष्मण भगत, दिनकर लक्ष्मण भगत, मारुती लक्ष्मण भगत (सर्व रा. बहुली, ता. हवेली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दिलीप कांबळे यांचा मुलगा आनंता व नथू भगत यांची मुलगी अमृता यांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यावेळी अमृता हिचे वय २१ आणि आनंता याचे वय १८ वर्षे होते. त्यांच्या प्रेमाची दिलीप कांबळे यांना माहिती झाल्यावर त्यांनी ते भगत यांच्या लक्षात आणून दिले. तेव्हा भगत यांनी या लग्नाला नकार दिला. त्यामुळे २०१३ मध्ये अमृता हिने पाण्यात उडी मारुन आत्महत्या केली. भगत यांनी दिलीप कांबळे, आनंता व इतरांवर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा मागे घेण्यासाठी भगत यांनी ५ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे. ५ लाख रुपये दिले नाही तर सर्व घरातील लोकांना जेलमध्ये खडी फोडायला पाठवतो.

तसेच कांबळे हे मुलासोबत गावातील सार्वजनिक कार्यक्रमात गेले असताना भगत यांनी शिवीगाळ करुन धमकी देऊन त्रास दिला. या त्रासाला कंटाळून आनंता याने ७ डिसेंबर रोजी राहत्या घरी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. त्यानंतर कांबळे यांनी धार्मिक विधी केल्यानंतर शनिवारी (दि.५) उत्तमनगर पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार नथू भगत व त्यांच्या नातेवाईकांवर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक के़ के़ कांबळे अधिक तपास करीत आहेत.

You might also like