एजंटाचे अपहरण करुन २५ लाखांच्या खंडणीची मागणी

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन
निगवे खालसा येथील फायनान्स कंपनीच्या एजंटचे २५ लाखांच्या खंडणीसाठी कळंबा येथून अपहरण करण्यात आले त्याला मारहाण करुन ८० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याप्रकरणी आठ जणांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यात संशयित विशाल शिंदे कांबळे, राजा, गणीभाई यांचा समावेश आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,”विजय निवृत्ती कांबळे (३८, रा. निगवे खालसा, ता. करवीर) हे गेल्या आठ ते दहा वर्षांपासून बॅँका, पतसंस्था, फायनान्स कंपन्यांतील कर्ज मिळवून देण्यासाठी लोकांना मदत करतात. या माध्यमातून त्यांना कमिशन मिळते.

विशाल शिंदे याने गुरुवारी त्यांना फोन करून कळंबा येथील साई मंदिरासमोर बोलावून घेतले. कळंबा येथील मंगल कार्यालयासमोर लावलेल्या मोटारीत आठ जणांनी जबरदस्तीने त्यांना बसविले. तेथून पाचगाव, आर. के.नगर, विद्यापीठ, चित्रनगरी, गोकुळ शिरगाव, फाईव्ह स्टार एमआयडीसी या मार्गावरून नेऊन स्टीलच्या पाईपने बेदम मारहाण केली. शिंदे याने तू, कर्ज प्रकरणामध्ये भरपूर पैसे मिळविले आहेस. आता आम्हाला २५ लाख रुपये दे, नाहीतर तुला ठार मारण्याची सुपारी घेतली असल्याची धमकी दिली.

त्यानंतर जबरदस्तीने त्यांच्या खिशातील साडेचार हजार, एटीएम कार्डवरून चार हजार व मित्र बाबासाहेब कांबळे यांचेकडून सायबर चौक येथे अनोळखी व्यक्तीकडून ७२ हजार असे सुमारे ८० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर त्यांना सोडून दिले. भयभीत झालेल्या विजय कांबळे यांनी याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद दिली आहे.