काँग्रेस महाविकास सरकारमधून बाहेर पडण्याच्या तयारीत?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्यावर महाविकास आघाडी सरकारमध्ये मोठा वाद सुरु असल्याचे समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधून काँग्रेस बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा जीआर मागे घेतला नाही तर काँग्रेसनं ही टोकाची भूमिका घेण्याचे निश्चित केले असल्याचे काँग्रेसमधील वरिष्ठ सुत्रांचे म्हणणे आहे. पदोन्नतीतील आरक्षणावर मुख्यमंत्री काय भूमिका घेणार यावर आघाडी सरकार टीकून असल्याची चर्चा आहे.

सत्ता हा काँग्रेसचा कधीच भाग नाही

पदोन्नतीमधील आरक्षणाच्या मुद्यावरुन काँग्रेस सरकारमधून बाहेर पडण्याच्या चर्चेवर नाना पटोले म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष म्हणून चर्चा काय सुरु आहे याची मला माहिती नाही. शासन घटनात्मक व्यवस्थेवर चालावं ही काँग्रेसची भूमिका आहे आणि ती नेहमीच राहणार आहे. सत्ता हा काँग्रेस पक्षाचा कधीच भाग राहिलेला नाही. देशाच्या संविधानाचं रक्षण करणं, जनतेचं रक्षण करणं हे काँग्रेसचं काम आहे. सगळ्यांना सोबत घेऊन काँग्रेसने देश उभा केला आहे. आता काही लोक देश विकत आहेत, असे नाना पटोले म्हणाले.

7 मे 2021 रोजी पदोन्नतीसंदर्भात राज्याचा जीआर काढण्यात आला होता. त्यानुसार मागास प्रवर्गासाठी पदोन्नतीत 33 टक्के जागा रिक्त न ठेवता सर्व शंभर टक्के पदोन्नत्या केवळ सेवा ज्येष्ठतेनुसार होतील आणि सेवाज्येष्ठता 25 मे 2004 च्या आधीच धरली जाणार आहे. या जीआरच्या 17 दिवस आधी 20 एप्रिल 2021 रोजी, पदोन्नतीतील आरक्षणाचा 33 टक्के कोटा रिक्त ठेऊन उर्वरित पदे खुल्या गटातून भरण्याचा जीआर आला होता. मात्र, अवघ्या 17 दिवसांत चक्रे फिरली आणि 7 मे चा जीआर आला. यामुळे मोठा वाद पेटल्याचे पहायला मिळत आहे.